माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे नेते अशोक चव्हाणयांची गाडी अडवणाऱ्या मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी 25 ते 30 मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. ज्यात शासकीय कामात अडथळा, पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करत थेट 353 सारख्या कलमांची नोंद करण्यात आली आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघाचेभाजप उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी अशोक चव्हाणNANDED जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावात गेले होते. यावेळी त्यांना प्रचंड विरोध करण्यात आला होता.

पोलिसांनी काढलेल्या प्रेस नोटमध्ये म्हटले आहे की, “1 एप्रिल रोजी खासदार आशोक चव्हाण हे मौ. कोंडा (ता. अर्धापुर) येथील खाजगी बैठक घेवुन परत निघाले होते. यावेळी त्यांची गाडी मौजे कोंढा येथील हनुमान मंदीराचे समोर चौकात आली असता, एकुण 25 ते 30 आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवुन एकत्रीत येवुन आशोक चव्हाण यांच्या गाडीचा रस्ता आडवीला. यावेळी तिथे कर्तव्यावर असलेले पोलीस अधीकारी चंद्रकशेखर कदम यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी चव्हाण यांची गाडी सुरक्षीतरीत्या काढुन दिली.
पोलीसांशी धक्का बुक्की केल्याचा आरोप…
यावेळी आरोपींनी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देवुन तुम्ही आम्हांला खासदार साहेबांना भेटुन बोलु का दिले नाही, असे म्हणुन तुमची पाहुन घेतो असे कर्तव्यावरील पोलीसांशी धक्का बुक्की करून वाद घालत, शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यामुळे अर्धापुर पोलीस ठाण्यात कलम 143, 147, 149, 341, 353, 323, 189 व सह कलम 7 क्रिमीनल लॉ अमेंडमेट कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहेत.
अशोक चव्हाण यांच्या पत्नीलाही विरोध…
विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांची गाडी अडवल्याची घटना घडल्यावर त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांची देखील मराठा आंदोलकांनी गाडी अडवली होती. अमिता चव्हाण मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथे प्रचारासाठी गेल्या होत्या आणि याचवेळी त्यांची गाडी मराठा आंदोलक यांनी अडवली. ‘जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली. हा सर्व विरोध पाहता माजी आमदार अमिता चव्हाण बराच वेळ कार्यकर्त्यांच्या घरात बसून होत्या. गावात येताना आणि जातानाही आंदोलकांनी घोषणाबाजी करत त्यांना विरोध दर्शवला.