• Tue. Apr 29th, 2025

जगात ‘एप्रिल फूल डे’, इथे ‘अच्छे दिन’, आदित्य ठाकरेंचा टोला

Byjantaadmin

Apr 2, 2024

नागपूर : बंडखोरी आणि गद्दारी मध्ये फरक आहे. तुमाने यांना रामटेकमध्ये तिकीट न मिळाल्यानंतर ४० गद्दारांनीही भविष्याचा विचार करावा. ज्याठिकाणी गद्दारांना तिकिटे मिळाली आहेत, तेथे निकाल वेगळे असतील. यवतमाळ-वाशिममध्ये महायुतीने अद्याप उमेदवार दिलेला नाही. यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, इथे भ्रष्टाचारी उमेदवार देणार की नवा चेहरा येणार हा प्रश्न आहे. यवतमाळमध्ये संजय देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आदित्य ठाकरे हे नागपूर विमानतळावर आले असता बोलत होते.

जगात ‘एप्रिल फूल डे’ साजरा होतो आपल्याकडे ‘अच्छे दिन’ म्हणून साजरा होतो – आदित्य ठाकरे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका करत म्हटलं की, ‘गेल्या १० वर्षात केंद्रात असो की राज्यात काही वर्षांपासून जी कामे व्हायला पाहिजे होती, जी आश्वासन दिली होती, ते कोणते काम झाले, हे सर्वांनाच माहीत आहे. कालच ‘एप्रिल फूल डे’ होऊन गेला. जगात काही देशांमध्ये ‘एप्रिल फूल डे’ साजरा होतो. मात्र आपल्याकडे हा ‘अच्छे दिन’ म्हणून साजरा होतो’.’देशभरात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. दिल्ली, बिहार, महाराष्ट्र, बंगाल आणि इतर ठिकाणी इंडिया आघाडीची जी बांधणी आहे ती मजबूत दिसत आहे’. आढळराव पाटलांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘जे शिवसेना वाचवण्यासाठी राष्ट्रवादीविरोधात लढत होते, आता काय झालं, जे काही वर्षांपूर्वी, काही दिवसांपूर्वी काय बोलले होते हे सर्वांना माहीत आहे. त्यांनी जेव्हा गद्दारी केली, कोणत्या पक्षात कोण आहे हे लोकांना माहिती आहे आणि लोकांच्या समोर हे चित्र आता स्पष्ट झाले आहे’.

लोकशाही संपत चालली आहे – आदित्य ठाकरे

देशातील लोकशाही संपत चालली आहे. संविधानाला मोठा धोका निर्माण झाला आहे. अशा वेळी लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण सर्व मिळून लढा देत आहोत. प्रकाश आंबेडकर यांचाही यात सहभाग महत्त्वाचा आहे. आमचा पक्ष सर्वांना बरोबर घेऊन चालला आहे. महाराष्ट्रातील सर्व जनता आमच्या पाठीशी आहे. कोण काय म्हणतो हे फार महत्वाचे नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed