जळगाव : जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भारतीय जनता पक्षामध्ये घरवापसी करणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. खडसे रविवारी रात्री अचानक दिल्लीला रवाना झाले. भाजपमधीलतील ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेऊन तिथेच त्यांचा भाजपप्रवेश होणार असल्याची चर्चा जळगाव जिल्ह्यात आहे.

लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीपासूनच एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू आहे. खडसेंनी त्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. मात्र, त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना भाजपने रावेर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी रावेरमधून शरद पवार गटाकडून लढण्यास नकार दिला. त्यामुळे खडसेंची भाजपशी जवळीक वाढल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली. रविवारी रात्री ते तडकाफडकी दिल्लीला गेल्याने ते भाजपमध्ये प्रवेश करतील, असे बोलले जात आहे.एकनाथ खडसेंनी स्वगृही परतावे,’ अशी इच्छा रक्षा खडसे यांनी नुकतीच व्यक्त केली होती. मंत्री गिरीश महाजन यांनीही काही दिवसांपूर्वी, ‘खडसे भाजपमध्ये परतण्यासाठी जोर लावत असल्याची चर्चा माझ्या कानावर आली आहे,’ असे सांगून भाजपात परतण्याच्या तयारीत असल्याचे संकेत दिले होते. दरम्यान, याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.काही दिवसांपूर्वीच खडसे कुटुंबाला दिलासा मिळाला होता. पुण्यातील एमआयडीसी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयाने खडसे यांच्या पत्नी आणि जावयाला अंतरिम जमीन मंजूर केला होता. पुण्यातला भोसरी येथील एमआयडीसी जागेतील भूखंडाच्या खरेदीवेळी शासनाचा महसूल बुडवल्याप्रकरणी एकनाथ खडसेंसह पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. मात्र खडसेंसह त्यांच्या पत्नी आणि जावई यांना नुकताच कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.
फडणवीसांशी मतभेदामुळे पक्षबदल
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन यांच्याशी असलेल्या वादामुळे एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर ऑक्टोबर २०२० मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शरद पवार यांनी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केल्यानंतरदेखील खडसे यांनी शरद पवार यांची साथ सोडली नाही.