विद्यार्थ्यांच्या अनोळख्या सत्काराने शिक्षक गहिवरले..
निलंगा:- वेणूताई यशवंतराव चव्हाण प्राथमिक आश्रम शाळा निलंगा येथील सहशिक्षक शेषेराव विठ्ठलराव बिराजदार हे नियत वयोमानानुसार 31 मार्च 2024 रोजी सेवानिवृत्त झाले. त्या निमित्ताने संस्था, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचा सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी सेवापूर्ती गौरव सोहळा करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांनी ” सुना है यह अंगण, सुना है यह मन, गुरुवर ना जाओ, यही कहती है धडकन ”
या गाण्यावर नृत्य सादर करून फुलांची उधळण करीत आपल्या आवडत्या शिक्षकाला सेवानिवृत्ती निमित्त निरोप दिला. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरण भावनिक होऊन उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आले आणि सेवानिवृत्त शिक्षक दाम्पत्यांनाही अक्षरशः गहिवरून आले. कार्यक्रमास संस्था अध्यक्ष विलास माने, सचिव विकास माने, उपाध्यक्ष उषाताई जाधव, माजी नगरसेविका कलावती माने, व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव रेशमे गुरुजी, संगांयो तालुका अध्यक्ष शेषेराव मंमाळे, मुख्याध्यापिका श्रीमती एस.टी. पंडित, व्ही. एम. गणेशवाडे, यांच्यासह शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, एस व्ही बिराजदार यांचे नातेवाईक व मित्रपरिवार उपस्थित होते. यावेळी संस्था, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, मित्र परिवार व नातलग यांच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचारी बिराजदार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
सेवानिवृत्त कर्मचारी बिराजदार यांच्या वतीने निवासी व अनिवासी विद्यार्थ्यांना मिष्ठान्न जेवण देण्यात आले.