दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने हे रविवारी (ता. 31 मार्च) पाच वर्षांनंतर स्वगृही काँग्रेस पक्षात परतले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत माने यांनी मुंबईत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. माने यांच्या काँग्रेस प्रवेशाचा फायदा सोलापूर लोकसभेच्या पक्षाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना होणार आहे. त्यामुळे माने यांची दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील ताकद शिंदे यांच्या पाठीशी उभी राहणार आहे.दिलीप माने (Dilip Mane) यांनी 28 ऑगस्ट 2019 रोजी काँग्रेसला (Congress) रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला होता. विधानसभेची 2019 ची निवडणूक त्यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघाऐवजी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून लढवली होती. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्याविरोधात शिवसेनेच्या तिकिटावर लढत दिली होती. मात्र, शिवसेनेचे महेश कोठे यांनीही अपक्ष म्हणून याच मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि मतविभागणीचा फायदा प्रणिती शिंदे यांना झाला. शिवसेनेचे कोठे आणि माने या दोघांचाही सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून पराभव झाला. तेव्हापासून ते शिवसेनेपासून अंतर राखून होते.महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळ गेले होते. विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांची आजही घट्ट मैत्री आहे. त्यातूनच जेव्हा अजित पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांनी DILIP MANE यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. मात्र, आघाडीत दक्षिण सोलापूर मतदारसंघ काँग्रेसकडे आहे, त्यामुळे त्यांनी काँग्रेस प्रवेशाचा निर्णय घेतला होता, त्यानुसार आज मुंबईत त्यांनी काँग्रेसचा ‘हात’ हाती घेतला.दिलीप माने विधानसभेला दक्षिण सोलापूरमधून 2009 मध्ये निवडून आले होते. मात्र, पुढील 2014 च्या मोदी लाटेच्या निवडणुकीत ते भाजपचे सुभाष देशमुख यांच्याकडून पराभूत झाले होते. पुढे शिवसेनेत प्रवेश आणि मधली काही वर्षे सर्वच राजकीय पक्षांपासून अंतर राखून वागणारे माने यांनी काही दिवसांपूर्वीच CONGRESS मध्ये परतण्याचा निर्णय घेतला होता. आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी काँग्रेसचा पर्याय निवडल्याचे स्पष्ट आहे.

प्रणिती शिंदेंना होणार फायदा
दिलीप माने यांचे उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात नेटवर्क आहे. माने हे मूळचे उत्तर सोलापूर तालुक्यातील आहेत. उत्तर सोलापूर पंचायत समितीचे सभापती, बाजार समितीचे सभापती, सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष, सोलापूर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आणि दक्षिण सोलापूरचे आमदार म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे त्यांच्या पाठिशी कार्यकर्ते आहेत.
शिवाय साखर कारखाना, बॅंका, बाजार समिती, पंचायत समिती, शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा मोठा संच आहे. दिलीप माने यांची ही ताकद आता काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी उभी राहणार आहे, त्यामुळे काँटे की टक्कर असलेल्या सोलापूरमध्ये माने यांच्या पक्षप्रवेशाचे पाठबळ प्रणिती शिंदे यांना मिळणार आहे.