• Mon. Apr 28th, 2025

“पंतप्रधान मोदींकडून मॅच फिक्सिंगचा प्रयत्न; निवडणुकीआधी आमच्या दोन खेळाडूंना…”; राहुल गांधींचा गंभीर आरोप

Byjantaadmin

Mar 31, 2024

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी झालेल्या अटेकच्या कारवाईविरोधात इंडिया आघाडीने आज (३१ मार्च) एकत्र येत दिल्लीत ‘लोकतंत्र बचाव महारॅली’ काढली. या रॅलीच्या माध्यमातून विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपावर जोरदार टीका केली. या रॅलीत देशभरातील २८ पक्ष सहभागी झाले होते. यावेळी बोलताना काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मॅच फिक्सिंगचा गंभीर आरोप केला. तसेच लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसचे बँक खाते बंद केले जातात, ही मॅच फिक्सिंग असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी काय म्हणाले?

“सध्या आयपीएलच्या मॅच सुरु आहेत. पण चुकीच्या पद्धतीने पंचावर (अंपायर) दबाव टाकून खेळाडूंना विकत घेतले जाते, कर्णधाराला घाबरवून मॅच जिंकल्या जातात. त्याला क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग म्हणले जाते. आता आपल्या पुढे लोकसभेच्या निवडणुका आहेत. मग पंच (अंपायर) कोणी निवडले? पंतप्रधान MODI यांनी निवडले. त्यानंतर मॅच सुरू होण्याच्या आधीच आमच्या दोन खेळाडूंना अटक करत तुरुंगात टाकले. त्यामुळे या निवडणुकीत नरेंद्र मोदी मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. नरेंद्र मोदी यांनी दिलेला ४०० पारचा नारा हा ईव्हीएम आणि माध्यमांवर दबाव टाकून देखील १८० च्या पुढे जाणार नाही”, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

काँग्रेस पक्षाचे बँक खाते बंद करण्याची कारवाई का?

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाचे बँक खाते बंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे. यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, “काँग्रेस पक्ष देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे. मग देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या पक्षाचे सर्वच्या सर्व खाते बंद केले गेले. आम्हाला लोकांना विविध ठिकाणी प्रचारासाठी पाठवायचे आहे. आम्हाला प्रचाराची मोहीम सुरू करायची आहे. बॅनर्स लावायचे आहेत. पण आमचे सर्व स्रोत बंद केले गेले आहेत. मग ही निवडणूक कशी होत आहे? नेत्यांना धमकावले जात आहे, पैसे देऊन सरकार पाडले जात आहेत. अनेक नेत्यांना जेलमध्ये टाकले जात आहे. केजरीवाल यांना तुरुंगात टाकले. हेमंत सोरेन यांनाही अटक केली, त्यामुळे हा सर्व मॅच फिक्सिंगचा प्रयत्न सुरू आहे”, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला.

“ही मॅच फिक्सिंग फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करत नसून भारतातील सर्वात मोठे तीन-चार उद्योगती करत आहेत. ही मॅच फिक्सिंग का होत आहे? तर याचे एक कारण असून भारताचे संविधान बदलण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे. ज्या गरिबांना संविधानाने हक्क दिले, त्याच संविधानाला संपविण्यासाठी ही मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असा खळबळजनक आरोप राहुल गांधी यांनी भाजपावर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed