• Thu. May 1st, 2025

शिंदेंनी प्रचंड ताकद लावलेल्या धाराशिवचा तिढा अखेर सुटला

Byjantaadmin

Mar 30, 2024

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महाविकास आघाडी व महायुतीकडून जागावाटपावर चर्चा सुरु आहे. महायुतीचे जागावाटप लवकरच जाहीर केले जाणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच धाराशिव लोकसभेच्या जागेवर महायुतीमधील तीन पक्षांनी दावा केला होता. त्यामुळे हा तिढा सुटत नव्हता.गेल्या दोन दिवसापासून याबाबत सागर बंगल्यावर या जागेवरून खलबत्त सुरु होती. या जागेचा तिढा शुक्रवारी सुटला असून महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ही जागा सुटली आहे. उमेदवारीबाबतचा सस्पेन्स कायम असून दोन दिवसात उमेदवार ठरण्याची शक्यता आहे.महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा उमेदवार कोण असणार यावरून सस्पेन्स कायम असताना महाविकास आघाडीतील शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली असल्याने त्यांनी प्रचाराचा धडाका सुरूच ठेवला आहे.

बुधवारपासून महायुतीमध्ये वेगाने चर्चा सुरु झाली असून मंगळवारी पुण्यात झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसने धाराशिव मतदारसंघावर दावा केला आहे. मराठवाड्यातील परभणी मतदारसंघ महादेव जानकार यांच्या रासपला सोडला असल्याने धाराशिव मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आग्रही होता. त्यानुसार गुरुवार व शुक्रवारी सागर बंगल्यावर धाराशिव जिल्ह्यातील नेते मंडळींची बैठक पार पडली.यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री तानाजी सावंत, आमदार राणाजगजीतसिंह पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले उपस्थित होते. या बैठकीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी ही जागा लढवावी असा आग्रह धरला होता. मात्र, राणाजगजीतसिंह पाटील यांनी ही निवडणूक लढविण्यास नकार दिला असल्याचे समजते. त्यानंतर माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांनी भाजपसोडून घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी अशी चर्चा झाली.

दुसरीकडे गेल्या दोन दिवसापासून धाराशिव जिल्ह्यातील भाजप नेत्याचे शिष्टमंडळ जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांच्या नेतृत्वाखाली जागा भाजपला सोडून स्थानिक नेत्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी करीत होते. मात्र ही जागा भाजप व शिवसेना शिंदे गटाऐवजी राष्ट्रवादीला सुटली आहे.हा मतदारसंघ महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणार असला तेही उमेदवार ठरलेला नाही.राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्या सुरेश बिराजदार यांच्यासह माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, विधानपरिषदेचे सदस्य विक्रम काळे यांच्या नावाची चर्चा कायम आहे. त्याशिवाय ऐनवेळी अचानक नवीन नाव पुढे येण्याची शक्यता आहे. काही चर्चेत नसलेली नावे अचानक राष्ट्रवादी काँग्रेसकडून (Ncp) पुढे आल्याने सर्वांना आता उमेदवारीची उत्सुकता लागून राहिली आहे.भाजपचे अरविंद पाटील निलंगेकर यांचे पण नाव Ncp अजित पवार गट कडून काल पासून चर्चेत आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *