• Thu. May 1st, 2025

प्रफुल्ल पटेल यांना क्लीनचिट

Byjantaadmin

Mar 29, 2024

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयने क्लीनचिट दिली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळाला आहे. सीबीआयने दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधातील प्रकरणात ‘क्लोजर रिपोर्ट’ सादर केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते प्रफुल्ल पटेल हे संपुआ सरकारच्या काळात नागरी विमान वाहतूक मंत्री होते. तेव्हा त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता. या घोटाळ्याची चौकशी सीबीआय करत होती. याप्रकरणी सीबीआयने दिल्लीतील राऊस अव्हेन्यू कोर्टात केस बंद करण्यासाठी अर्ज केला आहे. या कथित घोटाळ्यात सबळ पुरावे मिळाले नसल्याचा अहवाल सीबीआयने कोर्टात दाखल केला.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवारांसोबत जाणाऱ्या नेत्यांपैकी प्रफुल्ल पटेल हे आघाडीवर होते. खरा राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचाच असल्याचा दावा पटेल यांनीच केला होता.

पटेल शरद पवारांसोबत होते, तेव्हा २०१७ मधील भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास आणि चौकशी सुरू होती. आता ते अजित पवारांसोबत आणि भारतीय जनता पक्षासोबत आहेत. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रफुल्ल पटेलांना क्लीनचिट मिळाली असल्याने अजित पवार गटात आनंदाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *