• Fri. May 16th, 2025

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची कास धरा-न्यायाधीश एस. टी. भालेराव

Byjantaadmin

Mar 28, 2024

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची कास धरा… न्यायाधीश एस टी भालेराव

निलंगा:- गरीब रहा, उपाशी रहा, परंतु शिक्षण घ्या, शिक्षण हाच प्रगतीचा मार्ग आहे. भटक्या, विमुक्त,  वंचित, उपेक्षित वर्गातील विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची कास धरावी असे आवाहान निलंगा येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश एस.टी. भालेराव यांनी केले. 

निलंगा येथील वेणूताई यशवंतराव चव्हाण प्राथमिक आश्रमशाळा व प्रतिभाताई पवार माध्यमिक आश्रमशाळेत तालुका विधी सेवा समिती व विधिज्ञ मंडळ निलंगा यांच्या  संयुक्त विद्यमाने आयोजित कायदेविषयक शैक्षणिक शिबिरात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस टी भालेराव होते. प्रमुख अतिथी  म्हणून ॲड नारायण सोमवंशी, सरकारी वकील ॲड कपिल पंढरीकर, ॲड एच व्ही आलमले, ॲड डी.बी. सोळुंके, न्यायालयीन कर्मचारी सुजित चांदोरीकर, महेश पुजारी, संस्था अध्यक्ष विलास माने,  मुख्याध्यापिका एस.टी. पंडित, मुख्याध्यापक व्हि.एम गणेशवाडे आदी मंचावर उपस्थित होते. 

पुढे बोलताना न्यायाधीश भालेराव म्हणाले, विद्यार्थ्यांनी आश्रमशाळेत शिक्षण घेतो म्हणून मनात कोणताही न्यूनगंड  बाळगू नये.जीवनात प्रगती साधण्यासाठी मातृभाषेसोबत इंग्रजीसह इतर भाषांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.पाहिलेले मोठे स्वप्न  पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. बुध्दी सर्वांकडे असते त्याचा योग्य पद्धतीने काळानुरूप वापर करता आला पाहिजे. शारीरिक व बौद्धिक श्रम करणारे सर्व व्यक्ती समान आहेत.  संविधानाने दिलेल्या अधिकार व कर्तव्य यांची प्रत्येक नागरिकांनी जाणीव ठेवून समाजात कार्य करावे. माणसाच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या अनिष्ट रूढी परंपरा, जातीयता, भेदभाव, उच्चनीचता, श्रेष्ठ कनिष्ठ अशा विचारात अडकून स्वतःचे नुकसान करून घेवू नका.  गरिबीत आपला जन्म झाला यात आपला दोष नाही. जीवनात यशस्वी होण्यासाठी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला विचार अंमलात आणा. जिद्द व परिश्रमाने उपलब्ध साधन सुविधांचा वापर करून अडीअडचणीवर मात करा असे न्यायाधीश भालेराव यांनी सांगितले .

यावेळी ॲड नारायण सोमवंशी , ॲड कपिल पंढरीकर, ॲड अलमले यांनी शाळा व विद्यार्थ्यांशी निगडीत विविध कायद्यांची माहिती दिली व तसेच भावी नागरिक म्हणून संविधानाच्या मूल्यांची जोपासना करुन सामाजिक व विधायक उपक्रमात आपले योगदान द्यावे असे सांगितले. आश्रम शाळेच्या वतीने न्यायाधीश व वकील मंडळींचा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात श्रीमती बी. एम. गायकवाड यांच्या स्वागत गीतांनी करण्यात आली. संस्था अध्यक्ष विलास माने यांनी प्रास्ताविक करताना आश्रम शाळेचा लेखाजोखा  मांडला. सूत्रसंचालन श्रीशैल बिराजदार यांनी केले तर आभार अजय पाटील यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वी साठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *