लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. विविध राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग-आउटगोईंग सुरू झाले आहे. आज अभिनेता आणि माजी खासदार गोविंदामुख्यमंत्री(CM Eknanth Shinde) यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत प्रवेश करणार आहे. तर, दुसरीकडे अभिनेत्री करिष्मा कपूर आणि करिना कपूर देखील वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

मागील काही दिवसांपासून अभिनेता गोविंदा हा राजकारणात पुन्हा प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर आज गोविंदा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे. (Mumbai Lok Sabha Election) उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी गोविदांचं नाव चर्चेत आहे. त्यामुळे या मतदारसंघातून त्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
उत्तर पश्चिम मतदार संघातून महाविकास आघाडीकडून अमोल किर्तीकर यांच्या नावाची घोषणा ठाकरेंनी केली आहे.त्यामुळे गोविंदाला उमेदवारी दिल्यास अमोल किर्तीकर विरोधात त्याची लढत होईल. गोविंदाने याआधी 2004 मध्ये उत्तर मुंबईमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी गोविंदाने भाजपचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन मंत्री राम नाईक यांचा पराभव केला होता. मात्र, त्यानंतर गोविंदाची खासदारकीची कामगिरी फारशी प्रभावी राहिली नसल्याचे बोलले जाते.
करिश्मा-करिना वर्षा बंगल्यावर
अभिनेत्री करिष्मा कपूर आणि अभिनेत्री करिना कपूर या दोन अभिनेत्रीदेखील वर्षा बंगल्यावर दाखल झाल्या आहेत. या दोन्ही अभिनेत्री वर्षा बंगल्यावर गोविंदाच्या पक्ष प्रवेशाआधीच दाखल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. तर, दुसरीकडे या दोन्ही अभिनेत्री राजकारणात प्रवेशासाठी आल्या की काही कामानिमित्त आल्यात याचीदेखील चर्चा सुरू झाली आहे. कपूर कुटुंबीयांकडून या आधी राजकीय-सामाजिक मुद्यावर फार क्वचित भाष्य करण्यात आले आहे. राजकारणातही या कुटुंबातील कोणताही सदस्य आला नाही. त्यामुळे आता थेट अभिनेत्री करिष्मा कपूर आणि करिना कपूर-खान वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.