शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी 17 उमेदवारांची यादी जाहीर करताच महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. काही जागांबाबत अजूनही चर्चा सुरू असताना त्या जागांवर उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेस नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. काही मतदारसंघांत ठाकरेंच्या उमेदवारांविरोधात बंड पुकारण्यात आल्याने आघाडीत बिघाडी झाली आहे. त्यामुळे आता काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार, याकडे आघाडीचे लक्ष लागले आहे.उद्धव ठाकरे यांनी आज 17 उमेदवारींची यादी जाहीर केली असून, त्यामध्ये सांगलीसह मुंबईतील (Mumbai) पाच उमेदवार आणि राज्यातील इतर मतदारसंघांतील उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसने सांगली आणि मुंबई वायव्य या मतदारसंघांतील उमेदवारांवर आक्षेप घेतला आहे. सांगलीमध्ये चंद्रहार पाटील आणि मुंबई वायव्यमध्ये अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.यादीविषयी बोलताना काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, काही जागांबाबत अजूनही चर्चा सुरू आहे. या जागांवरील उमेदवार जाहीर केल्याने नाराजी आहे. सांगलीसह मुंबईतील काही जागा आमच्या पारंपरिक आहेत. तिथे कार्यकर्त्यांची फळी आहे. अजूनही या जागांबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्यांनी उमेदवारी जाहीर करायला नको होती. ठाकरेंनी फेरविचार करायला हवा. याबाबत आता पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे थोरातांनी स्पष्ट केले.मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikawad) यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आताच्या घडीला एवढेच सांगेन की, सांगली आणि मुंबईतल्या ज्या लोकसभेच्या जागा, जिथे मित्रपक्षांमध्ये एकमत होणे अजून बाकी आहे, तिथे एकतर्फी उमेदवार जाहीर करायला नको होते. मुंबईचा मुद्दा जिथे आहे, यासंदर्भात आम्ही आमची नाराजी आमच्या पक्षश्रेष्ठींकडे बोलून दाखवली आहे. त्यांच्या आदेशानुसार पुढची पावलं उचलण्यात येतील.

सांगलीत ‘मशाल नाही विशाल’चा मेसेज
सांगलीत चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ‘मशाल नाही विशाल’ असे मेसेज फिरू लागले आहेत. काँग्रेसकडून विशाल पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. त्यामुळे आता पाटील यांच्यासह आमदार विश्वजित कदम यांनी दिल्लीत धाव घेतल्याचे समजते. पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून त्यावर तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे. तसे न झाल्यास सांगलीत आघाडीत लढत होण्याची शक्यता आहे.
संजय निरुपम करणार बंड
अमोल कीर्तिकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. कीर्तिकरांचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर करत त्यांनी पुढील आठवडाभर पक्षाच्या निरोपाची वाट पाहणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी कीर्तिकरांसह शिवसेनेवर जोरदार टीका केली. मुंबईतून काँग्रेस संपवली जात असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई वायव्यमध्ये राष्ट्रवादीत नाराजी
मुंबई वायव्यमध्ये संजय दिना पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या उमेदवारीविरोधात कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली. त्यामुळे हा मतदारसंघातही आघाडीत बिघाडी झाली आहे.