मुंबई : सातारा आणि नाशिकच्या जागेवरील महायुतीतील तिढा अखेर सुटला असून साताऱ्यात उदयनराजे भोसले तर नाशिकमधून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ लोकसभेच्या रिंगणात असतील. उदयनराजे भोसले यांनी पक्षनेतृत्वाच्या भेटीगाठीसाठी, उमेदवारी मिळविण्याकरिता राजधानी नवी दिल्लीत तीन दिवस तळ ठोकला होता. दुसरीकडे नाशिकच्या जागेवर शिंदे गट आणि भाजपमध्ये कमालीची स्पर्धा असताना अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने बाजी मारून या जागेवरून छगन भुजबळ यांना लोकसभेची उमेदवारी निश्चित दिल्याचे वृत्त आहेसाताऱ्याच्या जागेवरून भाजप आणि राष्ट्रवादीत जोरदार स्पर्धा होती तर इकडे नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच, या जागेसाठी छगन भुजबळांच्या नावाची चर्चा सुरू होती. अखेर महायुतीने निवडणूकपूर्व सर्वे पुढे करून दोन्ही जागांवर मार्ग काढले आहेत. साताऱ्यातून उदयनराजे तर नाशिकमधून छगन भुजबळ यांची उमेदवारी निश्चित केली आहे.
साताऱ्यात लोकसभेला उदयनराजे, राज्यसभेची जागा राष्ट्रवादीला देणार
साताऱ्यात सध्या शरदचंद्र पवार गटाचे श्रीनिवास पाटील हे खासदार आहेत. ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने येथे राष्ट्रवादी काँग्रेसच उमेदवार देईल, असा आक्रमक पवित्रा अजित पवार यांनी घेतलेला होता. त्यामुळे उदयनराजे भोसले यांचं काय होणार? ते लोकसभा लढणार की नाही? लढणार तर कसे लढणार? असे प्रश्न उपस्थित होत होते. अखेर राष्ट्रवादी आणि भाजपने एकत्रित बसून यावर मार्ग काढला असून साताऱ्याची जागा भाजप लढवेल, त्याबदल्यात राष्ट्रवादीला राज्यसभा मिळेल, असे वृत्त आहे.
छगन भुजबळ यांची उमेदवारी निश्चित
लोकसभेच्या उमेदवारीसंदर्भात भुजबळांनी आपल्या निवडक समर्थकांसह बंद दाराआड चर्चा केली होती. तसेच येवल्याची निवडणूक यंत्रणा त्यांनी नाशिककडे हलवली होती. परंतु, यासंदर्भात होणाऱ्या चर्चांना भुजबळांनी थेट होकार, तसेच नकारही दिला नसल्याने सस्पेन्स वाढला होता. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार भुजबळ यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.