लोकसभा निवडणुकीसाठी ) महायुतीचे जागावाटप आणि उमेदवार निश्चित झालेला नसताना मतदारसंघात गाठीभेटी सुरू केलेले धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची उमेदवारी जाहीर करण्याची औपचारिकता शिवसेनेने (ठाकरे गट) पूर्ण केली आहे. शिवसेनेने राज्यातील 17 उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. त्यात राजेनिंबाळकर यांचा समावेश आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांतील बड्या नेत्यांनी पक्षांतर केल्यामुळे या वेळी खासदार राजेनिंबाळकर यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.2019 च्या निवडणुकीत राजेनिंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी त्यांचे कट्टर राजकीय विरोधक, चुलत बंधू आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना 1,26,858 मतांनी पराभूत केले होते. आमदार पाटील त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) लढले होते. मोदी लाटेतही पाटील यांना 4,46,747 मते मिळाली होती. त्या निवडणुकीनंतर पाटील यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाले. त्यावेळी शिवसेना आणि भाजपची युती होती.

2014 च्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रा. रवींद्र गायकवाड यांनी दिग्गज नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांचा 2,34,325 मतांनी पराभव केला होता. पुढच्याच निवडणुकीत राजेनिंबाळकर यांना हे मताधिक्य टिकवता आले नव्हते. आता 2024 च्या निवडणुकीत अत्यंत वेगळ्या परिस्थितीचा सामना खासदार राजेनिंबाळकर यांना करावा लागणार आहे.
2019 च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपची युती संपुष्टात आली. राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन झाले. शिवसेनेत मोठी फूट पडल्याने अडीच वर्षांनंतर ते सरकार पडले. खासदार राजेनिंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणे पसंत केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली आणि अजितदादा पवार (Ajit Pawar) महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले. दोन्ही पक्षांतील या फुटींचा अर्थातच धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणावरही मोठा परिणाम झाला.
शिवसेनेचे पालकमंत्री, भूम-परंड्याचे आमदार डॉ. तानाजी सावंत, उमरग्याचे आमदार प्रा. ज्ञानराज चौगुले, माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड हे प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. ठाकरे गटात आता खासदार राजेनिंबाळकर यांच्यासह धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे प्रमुख नेते राहिले आहेत. माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा. सुरेश बिराजदार यांच्यासह प्रमुख नेते अजितदादा पवार यांच्या गटात गेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
धाराशिव हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. अशा परिस्थिती आता हा बालेकिल्ला कोणत्या शिवसेनेला साथ देणार, यावर राजेनिंबाळकर यांचे भवितव्य ठरणार आहे. खासदार राजेनिंबाळकर यांची उमेदवारी जाहीर होणे ही केवळ औपचारिकता होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. लोकांच्या कायम संपर्कात राहणारा खासदार, अशी त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. गावागावांत त्यांचा परिचय आहे, त्यांना ओळखणारे लोक आहेत. सर्वांचा फोन उचलणारा, नाही उचलला तर कॉलबॅक करणारा खासदार, असे नॅरेटिव्ह त्यांनी सेट केले आहे. या बाबी महायुतीच्या उमेदवारासाठी जड जाण्याची शक्यता आहे.
धाराशिव मतदारसंघात तुळजापूर येथे भाजप, उमरगा येथे शिवसेना (शिंदे गट), औसा येथे भाजप, बार्शी येथे भाजपपुरस्कृत अपक्ष आणि भूम -परंडा येथे शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार आहेत. केवळ धाराशिव येथे ठाकरे गटाचा आमदार आहे. यासह महाविकास आघाडीतील फाटाफुटीमुळे खासदार राजेनिंबाळकर यांच्यासाठी ही निवडणूक गेल्यावेळीसारखी सोपी राहिलेली नाही, हे खरे असले तरी महायुतीचा उमेदवार कोण असेल, यावरही बऱ्याच बाबी अवलंबून आहेत.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबाबत मतदारांत सहानुभूती आहे. फोडाफोडीमुळेही लोक काही प्रमाणात भाजपवर नाराज आहेत. इलेक्ट्राेल बाँड, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचे प्रकरणही सत्ताधाऱ्यांना जड जाईल, अशी चर्चा आहे. याशिवाय महागाई, बेरोजगारी, पाणीटंचाई, वीजटंचाई आदी प्रश्नांचाही सत्ताधाऱ्यांना सामना कराला लागणार आहे. खासदार राजेनिंबाळकर निष्क्रीय आहेत, गेल्या पाच वर्षांत त्यांनी केंद्रातून एकही प्रकल्प आणला नाही, अशी टीका महायुतीचे नेते करत आहेत.
महायुतीत धाराशिव मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटेल आणि उमेदवार कोण असेल, याबाबत अनिश्चितता आहे. भाजपकडून या मतदारसंघात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी लढावे, असाही निर्णय ऐनवेळी होऊ शकतो. मात्र, लोकसभा लढवण्याची त्यांची इच्छा नाही, अशी चर्चा आहे. मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला (अजितदादा गट) सुटल्याचा दावा त्या पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे, मात्र उमेदवार कोण याबाबत संभ्रम आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जागा सुटली तर आपल्याला उमेदवारी निश्चित मिळणार, याबाबत त्यांना खात्री होती, मात्र आता माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली आहे. प्रत्यक्षात, परदेशी हे कॅमेऱ्यासमोर निवडणुकीसाठी नाही म्हणत असले तरी जागा सुटली तर ते भाजपचे उमेदवार असतील, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. परदेशी यांनी भाजपकडून लढण्याची तयारीही सुरू केली आहे. त्यांची फेसबुक वॉल पाहिली की हे कोणाच्याही लक्षात येईल.
‘मित्रा’च्या कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांनी चाचपणी सुरू केली आहे, संपर्क वाढवला आहे. काही जुन्या राजकीय घराण्यांनाही त्यांनी भेटी देणे सुरू केले आहे. जागा राष्ट्रवादीला सुटली तरी परदेशीच उमेदवार असतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे प्रा. बिराजदार समर्थकांचे टेन्शन वाढले आहे. शिंदे गटही या जागेसाठी अडून बसला आहे. आरोग्यमंत्री सावंत यांनी आपले पुतणे धनंजय सावंत यांना उमेदवारी मिळावी, यासाठी तगडी फिल्डिंग लावली आहे. माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड हेही इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
उमेदवारी नाही मिळाली तर सावंत, बिराजदार, प्रा. गायकवाड यांची भूमिका काय असेल, याकडे मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. गेल्यावेळी उमेदवारी न मिळाल्यामुळे प्रा. रवींद्र गायकवाड नाराज होते. उमरगा-लोहारा तालुक्यांत या नाराजीचा फटका राजेनिंबाळकर यांना बसेल, असे वाटत होते. मात्र, तसे झाले नाही. उलट या मतदारसंघातून राजेनिंबाळकर यांना मोठे मताधिक्य मिळाले होते. त्यावेळी भाजप राजेनिंबाळकर यांच्यासोबत होता, हेही विसरून चालणार नाही. एकाकी पडल्याचे दिसत असलेले राजेनिंबाळकर हे चाणाक्ष आहेत. ते लोकांची भाषा बोलतात, लोकांमध्ये सहज मिसळतात. आता ते बलाढ्य महायुतीचा कसा सामना करणार, आणखी कोणते नॅरेटिव्ह सेट करणार, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.