वंचित बहुजन आघाडीच्या राज्य समितीची मंगळवारी ( 27 मार्च ) बैठक झाली. त्या बैठकीतील निर्णयाबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातील पत्रकार परिषदेत माहिती दिली. मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीचा तपशील आंबेडकरांनी या पत्रकार परिषदेत सांगितला. ओबीसी आणि मुस्लिम समाजाला वंचित प्राधान्य देणार आहे. अल्पसंख्याक जैन समाजाला उमेदवारी देण्याची घोषणा आंबेडकरांनी केली. त्यामुळे वंचित महाविकास आघाडीबरोबर जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक असलेल्या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांनी उमेदवार घोषित केले. उमेदवार गरीब समाजातील असावा असा निकष ठेवण्यात आला आहे. सर्वप्रथम वंचित घटकातील नव्या उमेदवारांना पाठिंबा मिळेल, असे मत आंबेडकर यांनी मांडलं.”30 तारखेपर्यंत थांबावं, अशी विनंती जरांगे-पाटील यांनी केली आहे. आम्ही तो मुद्दा मान्य केला आहे. 30 मार्चनंतर उर्वरित जागा जाहीर करू. नागपूर येथील उमेदवार विकास ठाकरे यांना आमचा पाठिंबा आहे, तर सांगलीत प्रकाश शेंडगे लढले, तर त्यांनाही पाठिंबा देण्यात येईल,” असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.

“जरांगे-पाटील यांच्यासोबत 2 तारखेपर्यंत चर्चा करण्यात येईल. नंतर 4 एप्रिलपर्यंत अंतिम निर्णय घेण्यात येईल. जरांगे-पाटील यांचा घटक दुर्लक्षित करता येणार नाही. सामान्य जनतेला बदल हवा आहे. आणि तो बदल आवश्यक आहे. जरांगे-पाटील यांनी कोणताही पक्ष स्थापन केलेला नाही किंवा त्यांना पक्ष काढायचाही नाही. म्हणूनच सामाजिक युती होत आहे. ज्याला आम्ही राजकीय परिमाण देणार आहोत,” असं आंबेडकरांनी स्पष्ट केलं.
आंबेडकरांनी जाहीर केलेल्या उमेदरावांची नावं –
- भंडारा गोंदिया – संजय गजानन केवट
- गडचिरोली – हितेश पांडुरंग मडावी
- चंद्रपूर – राजेश वारलुजी बेले
- बुलडाणा – वसंत राजाराम मगर
- अकोला – प्रकाश आंबेडकर
- अमरावती – प्राजक्ता तारेकश्वर पिल्लेवार
- वर्धा – प्रा. राजेंद्र साळुंखे
- यवतमाळ वाशीम – खेमसिंग प्रतापराव पवार
- नागपूर – ( काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंना पाठिंबा )
- रामटेक – जाहीर करणार
- सांगली – प्रकाश शेंडगेंना पाठिंबा