दक्षिण सोलापूरचे माजी आमदार आणि शिवसेना नेते दिलीप माने पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. आज झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत माने यांनी पुन्हा काँग्रेसमध्य करावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माने काय निर्णय घेणार, याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, माने स्वगृही परतल्यास त्याचा फायदा काँग्रेसच्या लोकसभेच्या संभाव्य उमेदवार प्रणिती शिंदे यांना होऊ शकतो.आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दिलीप माने यांनी आज कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भाषणे झाली. बहुतेकांनी माने यांना पक्षांतर करण्याचा आग्रह केला. माने हे पुर्वी काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसच्या तिकीटावरच ते आमदारही झाले होते. पण मागील निवडणुकीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून आपले नशीब आजमावले होते. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

निवडणुकीत (Election) पराभव झाल्यापासून माने शिवसेनेपासून चार हात लांबच होते. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसशी (NCP) जवळीक वाढत चालली होती. पण आता राष्ट्रवादीतही फूट पडल्यानंतर त्यांच्या राजकीय वाटचालीबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यापार्श्वभूमीवर माने यांच्याकडून आज बोलावलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांना साद घातली.
काँग्रेस मध्ये पुन्हा प्रवेश करण्याची मागणी दिलीप माने समर्थकांनी बैठकीत केली आहे. त्याचबरोबर भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्याविरोधात दक्षिण सोलापूरमधून निवडणूक लढवण्याचा आग्रहही कार्यकर्त्यांचा होता. काँग्रेसचे निष्ठावंत आमदार म्हणून दिलीप माने यांची ओळख होती. त्यामुळे ते पुन्हा काँग्रेसमध्येच परततील, अशी शक्यता आहे.
…तर प्रणिती शिंदेंना बळ
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळू शकते. दिलीप माने यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास शिंदे यांची ताकद वाढणार आहे. या मतदारसंघातून अद्याप भाजपकडूनही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. उमेदवारीबाबत पक्षात बराच खल सुरू आहे. सध्यातरी काँग्रेस आणि भाजपमध्ये (BJP) थेट लढत होणार असल्याचे चित्र आहे.