धुळे मतदारसंघासाठी भाजपने विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ही उमेदवारी अनपेक्षित असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. उमेदवार बदलावा, यासाठी कार्यकर्ते आता कामाला लागले आहेत.

धुळे मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडे इच्छुकांची संख्या मोठी होती. या इच्छुकांच्या प्रयत्नांमुळे आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या नेत्यांमुळे यंदाच्या निवडणुकीत भामरे यांना उमेदवारी मिळेल की नाही, याबाबत अनिश्चितता होती. मात्र, भाजपने भामरेंना तिसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी दिली आहे.भामरे यांना उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांचे स्पर्धक उमेदवार नाराज झाले आहेत. यामध्ये निवृत्त पोलिस अधिकारी प्रताप दिघावकर प्रमुख आहेत. दिघावकर यांनी उमेदवारीच्या अपेक्षेने पक्षात प्रवेश केला होता. पक्षाच्या काही नेत्यांनी त्यांना उमेदवारीबाबत आश्वासनदेखील दिले होते. त्याची पूर्तता न झाल्याने दिघावकर नाराज असल्याचे समजते. दिघावकर यांनी सध्या भाजपच्या नेत्यांशी संपर्क करून उमेदवारीच्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे.
प्रताप दिघावकर तसेच अन्य काही इच्छुकांच्या समर्थकांनी DHULE उमेदवार बदलावा, असा आग्रह धरला आहे. याबाबत पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच अन्य नेत्यांना ईमेल केले आहेत. अनेक कार्यकर्त्यांनी उमेदवार बदलण्यासाठी ई-मेल पाठविण्याचे सत्र सुरू असल्याने भामरे अस्वस्थ झाले आहेत.
भारतीय जनता पक्षाने धुळे लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवार जाहीर केला आहे. महाविकास आघाडीने हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सोडला आहे. काँग्रेस पक्षाकडे अद्याप सक्षम उमेदवाराचा शोध सुरू आहे. त्यामुळे पक्षाने अद्याप कोणतेही नाव जाहीर केलेले नाही. या स्थितीत भारतीय जनता पक्षातील काही नाराज उमेदवार काँग्रेस पक्षाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. यामध्ये दोन ते तीन उमेदवारांना काँग्रेसची पसंती आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपच्या एका इच्छुक उमेदवारांशी संपर्क केल्याचे बोलले जाते. धुळ्याचे काँग्रेस नेते आमदार कुणाल पाटील यांनीही या संदर्भात प्रयत्न सुरू केल्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.