देशभरात सात टप्प्यांत लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) होणार असून, आज राष्ट्रपतींकडून पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी केली. पहिल्या टप्प्यात 17 राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेशांमधील 102 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी इच्छुकांना 27 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांचा समावेश आहे.निवडणूक आयोगाकडून 17 मार्च रोजी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार सात टप्प्यांत निवडणूक होणार असून, पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी आहे, तर मतमोजणी चार जून रोजी होणार आहे. बिहारमध्ये एका उत्सवामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख 28 मार्च असेल.

बिहार वगळता पहिल्या टप्प्यातील इतर राज्यांमध्ये 27 मार्चपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. या अर्जांची छाननी 38 मार्च रोजी होणार असून, बिहारसाठी ही तारीख 30 मार्च आहे, तर बिहार वगळता इतर राज्यांमध्ये उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अखेरची मुदत 30 मार्च असून, बिहारसाठी ही मुदत दोन एप्रिल आहे.19 एप्रिल रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांसह तामिळनाडू 29, उत्तर प्रदेश 8, राजस्थान 12, उत्तराखंड 5, अरुणाचल प्रदेश 2, आसाम 5, बिहार 4, मध्य प्रदेश 6, मणिपूर 2, मेघालय 2, पश्चिम बंगाल 3, मिझोरम, नागालँड, सिक्कीम, छत्तीसगड, त्रिपुरा, अंदमान निकोबार, जम्मू काश्मीर, लक्षद्वीप, पुद्दचेरीमधील प्रत्येकी एका मतदारसंघात मतदान होणार आहे. सर्वाधिक मतदारसंघ तामिळनाडू आणि राजस्थानमधील आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील तीन दिवस दक्षिणेतील राज्यांमध्ये प्रचारसभा घेतल्या आहेत. भाजपने आपले लक्ष दक्षिणेतील राज्यांवर केंद्रित केले आहे. त्यामध्ये तामिळनाडू हे राज्यही महत्वाचे मानले जात आहे. कर्नाटकमध्ये भाजपला संधी असली तरी तामिळनाडूमध्ये पक्षाला कसरत करावी लागणार आहे.
हे आहेत महाराष्ट्रातील मतदारसंघ
महाराष्ट्रामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. हे सर्व मतदारसंघ विदर्भातील असल्याने याभागात आता प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षही सज्ज झाले आहेत.