• Tue. May 13th, 2025

काँग्रेसचे प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी मोठे ‘गिफ्ट’ !

Byjantaadmin

Mar 20, 2024

राज्यात महाविकास आघाडीला विविध जागांची मागणी करणे, निवडणूकपूर्व विविध अटी आणि शर्थी ठेवणे, त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या अस्थिर भूमिकांमुळे चांगलेच विचलित झाले होते. अशा परिस्थितीत अखेर काँग्रेसने अकोल्यासाठी मोठा निर्णय घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे.2014 व 2019 प्रमाणे अकोल्याचे लोकसभा निवडणूक होण्याचे चिन्ह निर्माण होऊ नये. यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अकोल्यात उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. वंचित बहुजन आघाडी 2014 च्या निवडणुकीत नव्हती. त्यावेळी भारिप बहुजन महासंघ पक्षाचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर करत होते. तत्कालीन भाजप उमेदवार संजय धोत्रे यांनी 2014 मध्ये 4,56,472 मते घेत विजय संपादन केला होता. त्यावेळी काँग्रेसचे हिदायत पटेल हे दुसऱ्या स्थानावर होते. त्यांनी 2,53,356 मते मिळविली होती. 2014 मध्ये भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना 2,38,776 मते मिळाली होती. तेव्हा आंबेडकर हे हिदायत पटेल यांच्यामुळे अर्थात मुस्लिम उमेदवारामुळे पराभूत झाले होते.

2014 प्रमाणे 2019 ची निवडणूक झाली. पण, या वेळी आंबेडकर अकोल्यात तिसऱ्या नाही तर दुसऱ्या स्थानावर पोहाेचले होते. भाजप उमेदवार संजय धोत्रे यांनी 5,54,444 मते मिळवित ते विजयी झाले. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी 2,78,848 मते मिळविली. 2014 प्रमाणे 2019 मध्येदेखील काँग्रेसने मुस्लिम उमेदवार उभा करत आंबेडकर यांच्या विजयाचे गणित बिघडविल्याचे चित्र होते. काँग्रेस व सहकार नेते हिदायत पटेल यांनी 2,54,370 मते मिळविली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने अकोल्यात उमेदवारच उभा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता वंचित आणि भाजपमध्ये थेट लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काँग्रेसने इच्छुक उमेदवार डाॅ. अभय पाटील यांना विधानसभा पोटनिवडणूक लढण्याची तयारी सुरू करा, असा संदेश दिल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. त्यामुळेच अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात काँग्रेस उमेदवार देण्याची शक्यता आता धूसर झाली आहे, तर काँग्रेसच्या या निर्णयाने वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना दिलासा मिळाला आहे. अकोल्यात आता भाजपचे अनुप धोत्रे यांच्या विरोधात वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात थेट लढत होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेमके कोण बाजी मारते हे पाहण्यासारखे ठरेल.

अकोल्यात भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांच्या उमेदवारीवर संघ वर्तुळात घराणेशाहीचा आरोप होत असताना आंबेडकर यांना काँग्रेसने मोठा दिलासा दिल्याने अकोल्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष राहणार आहे. काँग्रेसला महाराष्ट्रात 15 पैकी सात जागांवर पाठिंब्याचा प्रकाश आंबेडकर यांचा प्रस्ताव काँग्रेसने तत्त्वतः स्वीकारल्याची माहिती आहे. काँग्रेसने अकोल्यात तिसऱ्यांदा मुस्लिम उमेदवाराचा विचार टाळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *