छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रकांत खैरे हेच असतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीबद्दलची घोषणा दोन दिवसांत होईल, अशी माहिती देखील मिळाली आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या पक्ष बदलाची चर्चादेखील आता थांबली आहे.छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा दावा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात या मतदारसंघाची जागा याच पक्षाला सुटेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. हा मतदारसंघ पक्षाला सुटणार असे गृहित धरून पक्षाच्या नेते, पदाधिकाऱ्यांनी तयारीदेखील सुरू केली आहे. चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली जाणार असे संकेत मिळाल्याचे पदाधिकारी सांगत आहेत. याच पार्श्वभूमीवर खैरे यांनी समर्थनगर भागात प्रचार कार्यालयाच्या उभारणीसाठी स्तंभपूजनदेखील केले.उमेदवार म्हणून खैरे यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करून उमेदवारीसाठी आपण दावेदार आहोत, असे जाहीर केले. त्याचबरोबर त्यांच्या पक्षबदलाच्या चर्चादेखील सुरू झाल्या.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारपासून मराठवाडा दौऱ्यावर आहेत. नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्याचा दौरा त्यांनी केला. या ठिकाणी संवाद सभा देखील घेतल्या. त्यांच्या या दौऱ्यात अंबादास दानवे सक्रीय होते. त्यामुळे त्यांच्या पक्षबदलाची चर्चा तुर्त थांबली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा मतदारसंघातून चंद्रकांत खैरे हेच उमेदवार असतील असे सूत्रांनी स्पष्ट केले. त्यांच्या उमेदवारीची घोषणा येत्या दोन दिवसात केली जाईल असेही सूत्रांनी सांगितले.

छत्रपती संभाजी नगर : नांदेड, हिंगोली, परभणीचा दौरा आटोपून उद्धव ठाकरे मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नांदेड विमानतळावरून छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले. छत्रपती संभाजीनगर येथे आल्यावर त्यांनी खुलताबाद येथे जाऊन भद्रामारोतीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी वेरुळ येथे जाऊन श्री घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. त्यांचा मुक्काम शहरातील रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये मुक्काम होता. बुधवारी दुपारी बारा वाजता ते बुलढाणा, मेहेकर, सिंदखेडराजा येथे रवाना होणार आहेत. सायंकाळी त्यांचे आगमन पुन्हा छत्रपती संभाजीनगरात होणार असून, त्यानंतर ते मुंबईला रवाना होणार आहेत.