• Sun. Aug 17th, 2025

घड्याळ’ चिन्ह वापरताना अजित पवार गटाला करावे लागेल अटींचे पालन; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, शरद पवार गटासाठी आनंदाची बातमी

Byjantaadmin

Mar 19, 2024

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला मोठा दिलासा दिला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शरद पवार गट निवडणूक चिन्ह म्हणून ‘तुतारी वाजवणारा माणूस’ चा वापर करू शकतो. याआधी जेव्हा निवडणूक आयोगाने पवार गटाला हे चिन्ह दिले होते तेव्हा त्याचा वापर राज्यसभा निवडणुकीपूरता वापर करण्याचे आदेश होते. आता मात्र शरद पवार गटाला हे चिन्ह लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत देखील वापरता येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार गटाला दिलासा देत असताना निवडणूक आयोगाला देखील स्पष्ट आदेश दिले आहेत. पवार गटाला देण्यात आलेले तुतारी चिन्ह अन्य कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवाराला देण्यात येऊ नये असे निर्देश न्यायालयाने आयोगाला दिले आहेत.याचबरोबर निवडणूक आयोगने अजित पवार गटाला देखील महत्त्वाचे असे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेले घड्याळ हे जरी निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिले असले तरी यासंदर्भातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. त्यामुळेच अजित पवार गटाने यापुढे घड्याळ चिन्ह वापरत असताना प्रत्येक वेळी आणि प्रत्येक ठिकाणी तसा उल्लेख करावा असे सांगितले आहे. याचाच अर्थ यापुढे अजित पवार गट कोणत्याही सभेत, जाहिरातीत, व्हिडिओमध्ये घड्याळ चिन्ह वापरले तेव्हा तेव्हा त्यांना घड्याळ चिन्हाचा वापर करण्या संदर्भातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे, अशी नोट लिहावी लागणार आहे. ही नोट सर्वांना दिसेल अशा पद्धतीने लिहले पाहिजे असे देखील न्यायालयाने म्हटले आहे.अजित पवार आणि काही आमदार,खासदार बंडखोरीकरत शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी मुळ पक्ष आपलाच असल्याचे सांगत त्यांनी पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता. या प्रकरणी निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निकाल दिला होता. तर विधानसभेचे अध्यक्षांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची असल्याचे म्हटले होते. यावर शरद पवार गटाने न्यायालयात धाव घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *