जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सी-व्हिजील कक्षाच्या कामकाजाचा घेतला आढावा
लातूर, दि. 19 : भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 कार्यक्रमानुसार जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या काळात आदर्श आचारसंहिता भंगाच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी सी-व्हिजील (cVigil) मोबाईल ॲपची सुविधा भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या कक्षाला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भेट देवून येथील कामकाजाचा आढावा घेतला.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आदर्श आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी अनमोल सागर, प्रभारी अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बालाजी मरे यांची यावेळी उपस्थिती होती.
आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्यास त्या प्रसंगाचे ॲपमध्ये छायाचित्र अथवा व्हीडीओ काढून तक्रार नोंदविता येणार आहे. त्यावर जिल्हास्तरीय कक्षातून त्वरित कार्यवाही केली जाणार आहे. सी व्हिजील ॲपवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तातडीने दखल घेवून त्याचा निपटारा केला जाणार असून यासाठी विविध अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या सर्व कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी घेतला. तसेच सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी आपली जबाबदारी अचूकपणे आणि विहित कालावधीत पार पाडावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.