बीड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवारी घोषित करण्यात आली नाही. मात्र आता पंकजा मुंडे यांच्यासमोर सक्षम उमेदवार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत.
विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून त्या उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या अजित पवारांसोबत असलेल्या बजरंग सोनवणे यांनी देखील काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती. मात्र बजरंग सोनवणे यांच्या ऐवजी शरद पवारांकडून ज्योती मेटेंना झुकते माप मिळण्याची शक्यता आहे.

पंकजा मुंडेंच्या विरोधात महिला उमेदवाराला पसंती मिळण्याची शक्यता
भाजपकडून पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या विरोधात महिला उमेदवार देण्याला पसंती मिळू शकते. मराठा आरक्षणाबाबत नेहमी आग्रही राहिलेले शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या ज्योती मेटे या पत्नी आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी बीडमध्ये तीव्र आंदोलने गेले काही दिवसांमध्ये पाहायला मिळाली आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवारांकडून मराठा आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची सांगड घालण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.
बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे?
बीडची जागा महाविकास आघाडीत शरद पवारांना सुटण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीवेळी धनंजय मुंडे अजित पवारांच्या गटात सहभागी झाले. त्यामुळे धनंजय मुंडे यांची ताकद पंकजा मुंडे यांना मिळणार आहे. विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना उमेदवारी देऊन शरद पवार मास्टर स्ट्रोक प्लॅन करण्याची शक्यता आहे. आता महाविकास आघाडीतून ज्योती मेटेंना उमेदवारी जाहीर होणार का? beed मध्ये पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे लढत होणार का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.