मी पुन्हा येईल ही केवळ सिंगल लाईन नव्हती तर मी पुन्हा येईल यात बऱ्याच गोष्टी समाविष्ट होत्या. मी पुन्हा येईल, तर मी आलोच. मी आलो तर दोन्ही पक्ष फोडूनच आलो, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मुलाखतीत केले होते. यावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेयांनी देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जाहीर सभांचा धडाका लावला आहे. आज उद्धव ठाकरे हे हिंगोलीच्या दौऱ्यावर आहे. उमरखेड येथे त्यांनी जनसंवाद मेळाव्यातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी सडकून टीका आहे.
खरंतर फडणवीसांना जेलमध्ये टाकलं पाहिजे
उद्धव ठाकरे म्हणाले की देवेंद्र फडणवीस एका इंटरव्यूमध्ये म्हणाले की, मी परत आलो, दोन घरं फोडून आलो. खरंतर त्यांना घर फोडले म्हणून जेलमध्ये टाकले पाहिजे. अंतरवाली सरासरीमध्ये मी आणि शरद पवार सुरुवातीला गेलो होतो. जरांगे पाटील कोण लागतात आमचे. पण तुम्ही महिलांवर लाठीचार्ज करता, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी फडणवीसांवर केला आहे.
मिंधेंना भरपूर दिलं पण काहींना भस्म्या रोग असतो
ते पुढे म्हणाले की, त्यांनी बाण आणि पक्ष चोरला पण मी जिथे जातो तिथे गर्दी वाढते आणि त्यांच्या पोटात दुखते.नवीन समीकरण झाल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे. हे समीकरण करून आपण सरकार चालवलं, त्या काळात सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून नाव माझं होत पण यश तुमचे होते. लोकसभा निवडणुक जवळ आली आहे. गद्दार येवून दोन वर्ष झाली त्या काळात मी आलो नाही. त्यांचे काम पाहिलं. हे म्हणतात सरकार आपल्या दारी पण हे सरकार अमित शाह यांच्या दारी आहेत. कटपुतलीचा खेळ चालू आहे. तिसरी दोरी यांच्या तंगड्या वर होणार आहे. मिंधेंना भरपूर दिलं पण काहींना भस्म्या रोग असतो, अशी टीका त्यांनी यावेळी मुख्यमंत्री eknath shinde ंवर केली आहे.
तुमच्यापेक्षा ठाकरे घराण्याला महाराष्ट्र चांगला ओळखतो
2014 पासून मोदीजी सरकारला सांगत होते. शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करू. जो जनतेशी दिवसाढवळ्या खोटं बोलतो तो मला खोटं ठरवतोय. तुमच्यापेक्षा ठाकरे घराण्याला maharashtra चांगला ओळखतो. मोदी-शाह यांच्या सात पिढ्यांचा हिशोब मांडा आणि माझा मांडा, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले. मुस्लिम आज शिवसेनेसोबत का येतोय? भाजपला सोडलं पण खरं हिंदुत्व सोडलं नाही. आपलं हिंदुत्व वेगळं आहे. त्यांचं थापा मारणारा हिंदुत्व आहे. मोदी धनगर मराठा समाजाच्या शिष्टमंडळांना भेटलं का? त्यांना अतिरेक्यांना भेटायला वेळ आहे पण हक्कासाठी झगडणाऱ्यांसाठी नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली. तुम्ही नेहमी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देत आहे. या वेळीही शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केले आहे.