मनसे-भाजप युतीच्या हालचाली मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते अमित शहा (Raj Thackeray and Amit Shah) यांच्यात राजधानी दिल्ली येथे युतीबाबत बैठक देखील सुरु आहे. या बैठकीसाठी राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे आणि भाजप नेते विनोद तावडे उपस्थित आहेत. या बैठकीत नेमका काय निर्णय होणार? याकडे महायुतीसह महाविकास आघाडीचंही लक्ष लागलेलं आहे.मनसे-भाजप युतीच्या हालचाली सुरु होताच विरोधकांनी या युतीवर टीका करायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी भाजपने मनसेसोबत (BJP-MNS) युती करुन उत्तर भारतीय बांधवांचा विश्वासघात केल्याचं म्हटलं आहे.लोंढे यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, “उत्तर भारतीय बांधवांना लाठ्या काठ्यांनी मारणाऱ्या राज ठाकरेंना सोबत घेऊन भाजपा कोणत्या तोंडाने उत्तर भारतीयांची मते मागणार आहे? भाजपाने उत्तर भारतीय बांधवांचा फक्त विश्वासघातच केला नाही तर त्यांच्या जखमेवर मीठ चोळून त्यांच्या स्वाभिमानाला धक्का लावला आहे.” या ट्विटच्या माध्यमातून लोंढे यांनी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना मारहाण केल्याच्या घटनेची आठवण करुन देण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे.

उत्तर भारतीय बांधवांना लाठ्या काठ्यांनी मारणा-या राज ठाकरेंना सोबत घेऊन भाजपा कोणत्या तोंडाने उत्तर भारतीयांची मते मागणार आहे?
— Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 (@atullondhe) March 19, 2024
भाजपाने उत्तर भारतीय बांधवांचा फक्त विश्वासघातच केला नाही तर त्यांच्या जखमेवर मीठ चोळून त्यांच्या स्वाभिमानाला धक्का लावला आहे.