मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. अशातच शुक्रवारी ( 16 मार्च ) अचानक जरांगे-पाटील ‘भुजबळ फार्म’जवळ आले होते. त्यामुळे पोलिसांची अक्षरशः धावपळ उडाली. मनोज जरांगे-पाटील शुक्रवारी ( 16 मार्च ) अचानक नाशिकला आले होते. त्यांचा हा दौरा पूर्वनियोजित नव्हता. मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते विलास पांगारकर यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांची विचारपूस करण्यासाठी जरांगे-पाटील नाशिक दौऱ्यावर आले होते.पांगरकर यांचे निवासस्थान छगन भुजबळ यांच्या निवासस्थानालगत आहे. जरांगे-पाटील येथे आल्याने मोठ्या संख्येनं मराठा समाजाचे कार्यकर्तेदेखील जमले होते. अचानक जरांगे-पाटील ‘भुजबळ फार्म’ जवळ आल्याने नागरिक आणि पोलिसांना मात्र वेगळीच शंका येणे स्वाभाविक होते. त्यामुळे पोलिसांची अचानक धावपळ उडाली. भुजबळ यांना यापूर्वीही धमक्या आल्या असल्याने ‘भुजबळ फार्म’चा बंदोबस्त वाढविण्यात आला. लगतच्या दोन्ही पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांची धावपळ उडाली. ते सगळे काम सोडून जरांगे-पाटील यांच्या भेटीसाठी आले. अचानक झालेल्या या धावपळीमुळे परिसरातील नागरिकांनाही चर्चेला विषय मिळाला.

मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन सुरू झाले. त्याला राज्यभर मोठा प्रतिसाद मिळाला. या वेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून आरक्षण देण्यास विरोध केला होता. त्यासाठी त्यांनी जरांगे-पाटील यांना टीकेचे लक्ष्य केले होते. त्यामुळे भुजबळ आणि जरांगे-पाटील यांच्यातील शाब्दिक वाद टोकाला गेला. त्यामुळे भुजबळ हे मराठा समाजाच्या आंदोलकांच्या निशाण्यावर आले. या पार्श्वभूमीवर जरांगे-पाटील शुक्रवारी नाशिकला आले असता, पुन्हा एकदा या वादाची उजळणी झाली.
जरांगे-पाटील आल्याने ‘भुजबळ फार्म’च्या परिसरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. जरांगे-पाटील आल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे वातावरण चांगले तापले होते. अंबडचे पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर, भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, अंबड पोलिस ठाण्याचे मनोहर कारंडे यांसह तिन्ही पोलिस ठाण्यांचा फौज फाटा या ठिकाणी जमा झाला होता.यासंदर्भात जरांगे-पाटील यांना विचारणा केली असता, ते म्हणाले, “मी केवळ पांगारकर हे आमचे सहकारी आजारी असल्याने भेटण्यासाठी आलो आहे. त्यांची प्रकृती खालावल्याचे कळल्याने मी रात्रीतून त्यांच्याकडे आलो आहे. भुजबळ यांच्या संदर्भात काहीही विषय नाही. आमच्याकडे माणुसकी आहे. इतरांकडे आहे की नाही, हे मी सांगू शकत नाही,” या शब्दांत त्यांनी या विषयाच्या वावड्यांना उत्तर दिले.