काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप 17 मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे रॅलीने होणार आहे. या रॅलीला राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार , माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह इंडिया आघाडीतील सर्व मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. या रॅलिच्या निमित्त शक्तिप्रदर्शन करून इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीचे रणसिंग फुंकण्याची शक्यता आहे.विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, काँग्रेस न्याय यात्रेच्या समारोपास इंडिया आघाडीतील सर्व नेते येणार आहेत. यात अखिलेश यादव, तेजस्वी यादव, एमके स्टॅलिन, फारुक अब्दुल्ला, चंपई सोरेन, कल्पना सोरेन, सौरभ भारद्वाज (आप), दिपांकर भट्टाचार्य, शरद पवार, उद्धव ठाकरेयांच्यासह इंडिया १५ हून अधिक मित्र पक्षाचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप 17 मार्च रोजी मुंबईच्या शिवाजी पार्कवर रॅलीने होणार आहे. यावेळी होणाऱ्या सभेत लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी रणसिंग फुंकणार आहे. दरम्यान, शनिवारी लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या रॅलीचा खर्च निवडणूक खर्चात दाखवला जाणार असल्याचे वडेट्टीवारांनी स्पष्ट केले.दरम्यान, राहुल गांधी यांची यात्रा शनिवारी दुपारी मुंबईत पोहोचणार आहे. सध्या यात्रा पालघर जिल्ह्यात आहे. पालघरमधून राहुल गांधींनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, सरकारने सुरू केलेल्या पीक विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होत नसून खासगी विमा कंपन्यांना होत आहे. पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान होत असताना, सरकार विमा कंपन्यांना मोठा हप्ता भरूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळत नाही. केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास देशव्यापी जात जनगणना केली जाईल, असेही आश्वासन राहुल गांधींनी दिले.
