• Tue. May 6th, 2025

अंगणवाडी सेविकांना लवकरच पेन्शन सुरु करणार, मंत्री आदिती तटकरे यांची मोठी घोषणा

Byjantaadmin

Mar 16, 2024

रत्नागिरी : ”राज्यभरात सुमारे १ लाख २० हजार अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोनचे वाटप करण्यात येत आहे. राज्यातील साडेतीन हजार अंगणवाडी सेविकांना पदोन्नतीसाठी विशेष बाब म्हणून १२वी मधून सूट देण्यात आली आहे. अंगणवाडी सेविकांना पेन्शनची सुविधा देण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल”, अशी मोठी घोषणा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी खेड येथे बोलताना केली आहे. ज्या अंगणवाड्यांमध्ये वीज नाही, अशा पहिल्या वर्षी ३६ हजार अंगणवाड्या सौर ऊर्जेवर करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. खेड येथील कै.द.ग.तटकरे सभागृहात महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून महिला मेळावा घेऊन अंगणवाडी सेविकांना मोबाईल वाटप करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या.

बाबाजी जाधव, माजी जि.प.सदस्य अजय बिरवटकर, तहसीलदार सुधीर सोनवणे, गटविकास अधिकारी यशवंत भांड आदी यावेळी उपस्थित होते.अंगणवाडी सेविकांना विविध कामांसाठी मोबाईल सिमसह देण्यात आला. तसेच अंगणवाडी सेविकांची व त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आपला विभाग घेईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. १३ हजार मिनी अंगणवाडींचे रुपांतर अंगणवाडीमध्ये केले असून १७ हजार मदतनीसांची भरती केली. लवकरच आणखी १३ हजार मदतनीसांची भरती करण्यात येणार आहे. ”लेक लाडकी” अंतर्गत वर्षात अडीच लाख कुटुंबाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी अधिकाधिक प्रस्ताव अपलोड करावेत, असेही आवाहन त्यांनी केले. जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीकांत हावळे यांनी स्वागत प्रास्ताविक करुन सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थित महिलांनी तृणधान्य, कडधान्य याचा खुबीने वापर करत लेक लाडकी अभियान पोषण पंधरवडा, पोषण आहाराचे महत्व यावर कलात्मक, आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या होत्या.

माविम तयार करणार शालेय गणवेश

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व शालेय शिक्षण विभाग यांच्यात झालेल्या करारानुसार बचत गटांच्या महिलांना शालेय गणवेशाचे कापड कटिंग करुन पुरविण्यात येणार आहे. त्याच्या शिवणकामासाठी ११० रुपये मिळणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात २ लाख विद्यार्थी असतात. त्यासाठी ‘माविम’ने शिवणकाम केंद्रांवर अधिक भर द्यावा, असे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. दरम्यान, लोकसंचालित साधन केंद्र खेड, नवतेजस्विनी तालुकास्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *