मुंबई: यंदाची निवडणूक महाराष्ट्रासाठी अभूतपूर्व असेल. गेल्या पाच वर्षांमध्ये राज्यात ऐतिहासिक घडामोडी घडल्या आहेत. दोन मोठे प्रादेशिक पक्षांमधील फूट राज्यातील जनतेनं पाहिली. दोन मोठ्या पक्षांची शकलं झाली. त्यांचे दोन-दोन गट पडले. मोठे गट भाजपसोबत गेले आणि त्यांनी सत्ता मिळवली. या संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, पाच वर्षांत झालेल्या विचित्र आघाड्या, युतींच्या पार्श्वभूमीवर मतदारराजा नेमका कोणाला कौल देणार याची उत्सुकता लागून राहिलेली आहे. एबीपी-सी व्होटरनं केलेल्या सर्वेक्षणानुसार, महायुतीचं मिशन ४५ फेल ठरण्याची शक्यता आहे.राज्यात सत्ताधारी महायुतीला २८, तर महाविकास आघाडीला २० जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचं लक्ष्य महायुतीनं ठेवलं आहे. पण तसं घडण्याची शक्यता कमी दिसत आहे. महाविकास आघाडीला २० जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे पक्षफुटीचा सामना करणारे उद्धव ठाकरे आणि शरद पवार जोरदार मुसंडी मारतील अशी शक्यता आहे. ठाकरे आणि पवारांना १६ जागा मिळतील असं सर्व्हे सांगतो. तर काँग्रेसला ४ जागांवर यश मिळू शकतं.

दुसरीकडे महायुतीचं मोठं नुकसान होताना दिसत आहे. गेल्या निवडणुकीत भाजपनं २३ जागा जिंकल्या होत्या. एकनाथ शिंदेंसोबत सध्या १३ खासदार आहेत. अजित पवारांसोबत लोकसभेचा केवळ एक खासदार आहे. त्यामुळे महायुतीतील खासदारांचा आकडा ३७ वर जातो. पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला २८ जागा मिळण्याचा अंदाज आहे.महायुतीत भाजपला सर्वाधिक २२ जागा मिळू शकतात. त्यांची १ जागा कमी होऊ शकते. महायुतीत सर्वाधिक नुकसान एकनाथ शिंदेंचं होऊ शकतं. शिंदे आणि अजित पवारांना मिळून केवळ ६ जागा मिळू शकतात. सध्याच्या घडीला शिंदेंसोबत १३ खासदार आहेत. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत शिंदेंचं सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता आहे.