शेत रस्त्याची कामे दर्जेदार गुणवत्तापूर्ण झाले पाहिजेत माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
बाभळगाव परिसरातील शेतरस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
प्रतिनिधी : बाभळगाव ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये १३ किलोमीटर शेतरस्ते करण्यात येणार आहेत. या शेतरस्त्यामुळे प्रत्येकाला शेताकडे जाण्यासाठी बारमाही रस्ता उपलब्ध होईल, या रस्त्याचे काम दर्जेदार गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे असे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.
बाभळगाव परिसरातील एकूण १३ किलोमीटर शेत रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे, गुरुवार दि. १४ मार्च रोजी बाभळगाव परिसरातील शारदा पांडुरंग बदामे ते युवराज थडकर यांच्या शेतापर्यंतच्या शेतरस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले, या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, तहसीलदार सौदागर तांदळे, सरपंच प्रिया सचिन मस्के, उपसरपंच गोविंद देशमुख, मनरेगाचे अभियंता सुनील श्रणगारे, लातूर पंचायत समितीचे अधिकारी मुक्तापुरे, ग्रामसेवक अनंत मडके, तलाठी गोविंद तावरे, रामदास पवार, सचिन मस्के, पोलीस पाटील मुक्ताराम पिटले आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी बाभळगाव ग्रामस्थ उपस्थित होते. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यावेळी म्हणाले की, बाभळगाव ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये १३ किलोमीटर शेतरस्ते सर्वांच्या विनंतीने करण्यात येणार आहेत. लातूरचे तहसीलदार व त्यांच्या टीमची हे रस्ते मोकळे करण्यात महत्त्वाची भूमिका असणार आहे. या रस्त्यामध्ये कुठलाही वाद नसावा अशी अपेक्षा मी बाळगतो असे सांगून प्रत्येकाला शेताकडे जाण्यासाठी बारमाही रस्ता उपलब्ध होईल, या रस्त्याचे काम दर्जेदार गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज थडकर यांनी केले तर शेवटी आभार बाभळगावचे उपसरपंच गोविंद देशमुख यांनी मानले.
