NILANGA -मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डाव टाकला आणि मराठ्यांना दहा टक्के आरक्षण जाहीर केले. पण ते टिकणारे नसल्याचे सांगून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही,’ असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. जरांगे यांची संवाद सभा आज निलंग्यात झाली. ‘सतरा दिवस उपोषणाला बसलो होतो, बेमुदत उपोषण काय असते? हे एकदा माझ्या शेजारी उपोषणाला बसून बघा,’ असे आव्हानही जरांगे- पाटील यांनी फडणवीसांना दिले.

मराठा समाजाची लढाई अंतिम टप्प्यामध्ये आली होती. आतापर्यंत 57 लाख कुणबीच्या नोंदी सापडल्या. सव्वा करोड मराठ्यांना प्रमाणपत्र प्राप्त होणार आहेत. राहिलेल्या समाजाचे काय? म्हणून सरकारने ओबीसीतून आरक्षण देण्याचे ठरवले, अधिसूचनाही काढली. आपली मागणी नवी नाही, ओबीसीमधून आरक्षण ही जुनीच मागणी आहे. 2018 मध्ये 13 टक्के आरक्षण मराठा समाजाला दिले होते, ते 2024 ला दहा टक्के केले. वार्षिक लोकसंख्या घटते का ? वाढते असा, सवाल करत जरांगे- पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली.मागासवर्गीय आयोगाने 28 टक्के मराठे मागास असल्याचा अहवाल दिला आहे. मग 14 टक्के आरक्षण द्यायला पाहिजे होते, दहा टक्के आरक्षण कशासाठी दिले? असा जाबही त्यांनी विचारला. चारही बाजूंनी मराठ्यांच्या छातीत खंजीर खुपसण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. सर्व समाजाने एकजूट दाखवा बघू, 2024 ला कसा गुलाल उधळतात ते? असे आव्हानच जरांगे- पाटील यांनी दिले. मराठा समाजातील लोकप्रतिनिधींना जातीपेक्षा पक्ष महत्त्वाचा वाटत आहे, म्हणून समाजाने डोळ्यांसमोर आपल्या मुलांचे भविष्य ठेवावे, राजकारण ठेवू नये, असे आवाहनही जरांगे- पाटील यांनी समाज बांधवांना केले.”समाजाची झालेली एकजूट फुटू देऊ नका, लवकरच सहा ते सात कोटी लोकांची मोठी सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशात अनेक आंदोलने झाली. मात्र, पहिला निर्णय असेल जे मराठा समाजाच्याआरक्षणासाठी एसआयटी स्थापन करून चौकशी लावली आहे. मात्र, ती एसआयआटी अजून माझ्याकडे फिरकलीच नाही, अशा शब्दांत जरांगे यांनी खिल्ली उडवली. सतरा दिवस बेमुदत उपोषण केले, त्यामुळे स्वभाव चिडचिडा झाला. काही अपशब्द तोंडातून गेले असतील, मी याबाबत माफीही मागितली आहे, असेही जरांगे म्हणाले.’बेमुदत उपोषण काय असते हे पाहायचे असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याशेजारी बसून उपोषण करून पाहावे. त्यांना योगा, प्राणायाम करायची गरज पडणार नाही. त्यांची पोट आणि पाट एक झाल्याशिवाय राहणार नाही. सलाइन लावायला हाताची नससुद्धा सापडणार नाही, असा टोलाही जरांगे-पाटील यांनी फडणवीसांना लगावला. ‘माझ्या नादाला लागू नका, तुम्ही चुकीच्या माणसाच्या नादाला लागलात. ओबीसीमधून आरक्षण घेतल्याशिवाय तुम्हाला सुट्टी नाही, असा इशाराही भाषणाच्या शेवटी जरांगे यांनी दिला.