• Fri. May 2nd, 2025

‘प्रीतम ताईला विस्थापित करणार नाही’, बहीण पंकजा मुंडे यांचा शब्द

Byjantaadmin

Mar 14, 2024

मुंबई | 14 मार्च 2024 BJP पंकजा मुंडे यांना भाजपकडून बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झालीय. पण या मतदारसंघात सध्या पंकजा यांच्या बहीण प्रीतम मुंडे या खासदार आहेत. पक्षाने प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून पंकजा यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी पंकजा यांनी आपल्या बहीणीचं तिकीट कापून आपल्याला उमेदवारी मिळाली असली तरी प्रीतम ताईला आपण विस्थापित करणार नाही, असं मोठं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांचं आगामी काळात राज्यसभा निवडणूक, विधानसभा किंवा विधान परिषदेच्या निवडणुकीत राजकीय पुनर्वसन होतं का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

“माझी उमेदवारी जाहीर झाली ही गोष्ट माझ्यासाठी नक्कीच सन्मानजनक आहे. त्यामुळे माझ्या भावना आभाराच्या आहेत. थोडीसी संमिश्र भावना नक्कीच आहेत. कारण प्रीतम मुंडे या गेल्या 10 वर्षांपासून खासदार होत्या. त्या खासदार असताना मी राज्याचं राजकारण करत असताना आता एकदम केंद्राच्या राजकारणात जात असताना थोडीसी धाकधूक नक्कीच वाटतेय. पण नवीन अनुभव आहे”, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.

आपल्याला उमेदवारी मिळेल, याची अपेक्षा होती का? असा प्रश्न पंकजा यांना विचारण्यात आला. “अपेक्षा होती. कारण याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर फार मोठा धक्का लागला असं नाही. कारण बऱ्याचदिवसांपासून तशा चर्चा सुरु होत्या. पण साहजिकच आहे, जोपर्यंत पक्षाकडून अधिकृतपणे सहीसोबत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत ती उमेदवारी अधिकृत नसते. त्यामुळे मला फार त्याबाबत आत्मविश्वास नव्हता”, असं पकंजा मुंडे यांनी सांगितलं.

‘मी प्रीतम मुंडे यांना विस्थापित करणार नाही’“प्रीतम मुंडे या वडील गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांचं एवढं छान डॉक्टरचं करिअर सोडून राजकारणात आल्या. त्यांनी दहा वर्ष संपूर्णपणे स्वत:ला राजकारणात वाहून घेतलं. आमच्या दोघींचं समन्वय फार छान होतं. मी राज्य सांभाळायची ते जिल्हा सांभाळायच्या. मी ज्या गोष्टी वेळेअभावी करु शकत नव्हती त्या गोष्टी प्रीतम ताई करत होत्या. मी धोरणात्मक गोष्टी करायची तर व्यक्तीगत गोष्टी त्या करायच्या. त्यामुळे आमच्या दोघींमध्ये तो समव्य चांगला होता आणि ते भविष्यातही राहणार आहे. प्रीतम ताई खासदार असताना मी पाच वर्ष घरी बसले. आम्हाला तोही अनुभव आहे. आता मला असं वाटतं तेवढा वेळ प्रीतम ताईंना वाट बघावी लागणार नाही. मी जे शब्द जाहीररित्या सांगितले की, मी प्रीतम मुंडे यांना विस्थापित करणार नाही. त्या शब्दावर मी कायम आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.पंकजा यांच्या या वक्तव्यानंतर प्रीतम ताईंना राज्यसभेची उमेदवारी मिळेल का? असा प्रश्न विचारण्यात आला. “आता याबद्दल मी भाष्य करणं बरोबर नाही. गेल्या 5 वर्षात 10 विधान परिषद आणि 10 राज्यसभा निवडणुका झाल्या असतील. त्या अनेकवेळा माझं नाव चर्चेत आलं होतं. त्या प्रत्येकवेळेला मी सांगितलं होतं की, ते माझ्या हातात नाही. माझा निर्णय नाही. त्यामुळे त्याबाबत आता भाष्य करणं अनुकूल नाही”, अशी प्रतिक्रिया प्रीतम मुंडे यांनी दिली.राजकीय वनवास संपला?राजकीय वनवास संपला असं म्हणता येईल का? असा प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला. त्यावर पंकजा यांनी “राजकारण हा एक फार मोठा खडतर प्रवास आहे. तो कायम असतो. पदावर असल्याने तो प्रवास कमी होतो असं नाही. पण नक्की आता बीड जिल्ह्याची जनता काय करेल याकडे महाराष्ट्राची जनता लक्ष ठेवून आहे. हा प्रवास कसा होतो याबाबत मलाही उत्सुकता आहे. कारण प्रीतम ताईंच्या लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही प्रचंड संघर्ष केला होता. त्यामुळे या निवडणुकीतही काय परिस्थिती निर्माण होते. निवडणुका दुसऱ्यांसाठी लढणं हा वेगळा अनुभव राहीला आहे. आता स्वत:साठी उमेदवारी मिळाल्यानंतर वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल”, अशी प्रतिक्रिया दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *