मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत गेल्याच आठवड्यात महायुतीमधील लोकसभा निवडणुकांचे जागावाटप जवळपास निश्चित झाले होते. मात्र ऐनवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उच्चपदस्थ नेत्यांनी या जागावाटपावर आक्षेप घेतल्याचे समजते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासदार निवडून येणार असतील तर मग त्यांना विनाकारण जास्तीच्या जागा देण्याऐवजी भाजपच्याच जागा वाढवा, असा मुद्दा संघाकडून मांडण्यात आल्याचे खात्रिलायकरित्या समजते.महायुतीच्या जागावाटपातील चर्चेने बरीच आघाडी घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात जागा वाटपाविषयी चर्चेच्या बऱ्यापैकी फेऱ्या झाल्या आहेत. प्रत्येक पक्षाचे विद्यमान खासदार, मतदारसंघातील प्रत्येक पक्षाची ताकद, तिन्ही पक्षांकडून करण्यात आलेले सर्वेक्षण याचा अभ्यास करून जागा वाटप ठरविण्यात आले होते.ज्या जागांबाबत वाद होता, त्या जागांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत मुंबईत होणाऱ्या बैठकीत योग्य तोडगाही निघाला होता. त्यामुळे दिल्लीतील भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांची परवानगी होऊन जागावाटप जाहीर करण्यात येणार होते. मात्र ऐनवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या जागावाटपाला आक्षेप घेतल्याचे समजते.
‘भाजपचे सर्वाधिक खासदार असावेत’
देशात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पसंती आहे. शिंदे यांच्या विद्यमान खासदारांपैकी काही खासदारांना पुन्हा उमेदवारी दिल्यास त्यांना निवडून आणण्यात भाजपच्या नाकीनऊ येणार आहेत. अशावेळी या जागा धोक्यात आणण्यापेक्षा तिथे भाजपच्याच उमेदवारांना उभे केल्यास त्या जागा निवडून आणणे सहज शक्य होईल आणि मोदी यांच्यासोबत सर्वाधिक खासदार संसदेत पोहोचतील, असा मुद्दा संघाकडून मांडण्यात आल्याचे समजते. यामुळेच जागावाटप लांबणीवर पडल्याचे कळते.