प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
लातूर : लातूर जिल्ह्यातील रेणापूर, लातूर, औसा तालुक्यामधून जाणारा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीच्या आड येत असल्याने तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढे आहे की, राज्यशासनाचा नागपूर ते गोवा हा पवनार ते पत्रादेवी हा शक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित आहे. ह्या महामार्गामुळे शेतकऱ्यांची उरली – सुरली जमीन यात जाणार आहे. शेतकऱ्यांकडील शेती आता गुंठेवारीवर आलेली आहे.ह्या महामार्गामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात मधोमध रस्ता गेला आहे, त्या शेतकऱ्यांना दुसऱ्याच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसणार आहे. तसेच ह्या महामृगामुळे पाण्याचा प्रवाह अडणार आहे तसेच प्रवाह बदलला जाणार आहे. अनेक शेतकरी भूमीहिन होणार आहेत. आमची जमीन बागायती असून आमच्या जमिनी मांजरा पट्टा , मांजरा धरणाखाली व तावरजा प्रकल्पाखाली येतात.
सुपीक जमिनी महामार्गाच्या आड येत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याने हा महामार्ग रद्द रद्द करण्यात यावा. हा महामार्ग रद्द नाही केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लातूर जिल्हा शाखेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धर्मराज पाटील, लातूर तालुका अध्यक्ष बालाजी शिंदे, जवळा ( बु. ) अध्यक्ष अनिल ब्याळे , शेखर ब्याळे , जिल्हा उपाध्यक्ष महारुद्र चौंडे , एड. विजयकुमार जाधव, बसवराज झुंजारे , शंकर झुंजारे ,व्यंकट कराड, गुंडाप्पा भोसले, बाबू स्वामी, महेश हावळ , हणमंत जाधव, प्रकाश सवासे , सुधाकर जवळेकर, सुधीर कुलकर्णी , व्यंकट पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.