संजय शेटेंच्या नेतृत्वात लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस नक्कीच मजबूत होईल : जयंत पाटील
लातूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) चे नूतन लातूर जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटन नक्कीच मजबूत होईल असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी लातूर बोलताना व्यक्त केला.

लातूरमध्ये गुरुवारी सकाळी आ. जयंत पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयाचे ‘ राष्ट्रवादी भवन’ चे उद्घाटन राजीव गांधी चौकातील चौंडे कॉम्प्लेक्स याठिकाणी थाटात पार पडले. त्यावेळी आ. पाटील आपले मनोगत व्यक्त करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील हे होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, जिल्हाध्यक्ष संजय शेटे, शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार,सक्षणा सलगर, मदन काळे, बापूसाहेब उजेडकर, पूजा मोरे, सुशीला मोराळे , नीळकंठ मिरकले, सोमेश्वर कदम, रफिक शेख, रेखा कदम, स्नेहा मोरे, शिवाजी मुळे , माधव गंगापूरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आता. जयंत पाटील यांनी स्वबळावर राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यालय सुरु केल्याबद्दल जिल्हाध्यक्ष संजय शेटे अभिनंदन केले. लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस केवळ उदगीर आणि अहमदपूर तालुक्यापुरती मर्यादित न ठेवता ती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या घोषित करण्यापूर्वी गावागावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कमिट्या जाहीर करून संघटन वाढविण्याचे आवाहन केले. संजय शेटेंच्या नेतृत्वावर लातूर जिल्ह्यात आपला पक्ष नक्कीच मजबूत होईल असा विश्वासही आ. पाटील यांनी व्यक्त केला.
जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांनी यावेळी आपण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारल्यापासून जिल्हाभरात आलेले आपले अनुभव कथन केले. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील केवळ दलाल कार्यकर्ते अजित पवारांसोबत सर्वच्या सर्व कार्यकर्ते शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पक्षासाठी स्वतःला झोकून द्यायला तयार असल्याचे सांगितले. पक्षाने आपल्यावर सोपविलेल्या जबाबदारीचे आपण नक्कीच सोने करू. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उदगीर आणि अहमदपूरच्या जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे खेचून आणल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचे सांगून संजय शेटे यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीही आपण सज्ज असल्याचे सांगितले.
बसवराज पाटील नागराळकर , राष्ट्रवादीच्या युवा नेत्या सक्षणा सलगर यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप विनायकराव पाटील यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. केशव अलगुले यांनी तर आभार प्रदर्शन बख्तावर बागवान यांनी केले. कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जिल्हाभरातील कार्यकर्ते , पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.