मुंबई: कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी.के. शिवकुमार यांना अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला. कोर्टाने त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली ईडीची सर्व प्रकरणं रद्द केली आहे. २०१७ साली शिवकुमार यांच्या दिल्लीतील घरातून जप्त करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांशी संबंधित ही केस आहे. आयकर विभागाच्या छाप्यात ही रक्कम जप्त केल्यानंतर, ईडीने याप्रकरणात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आता अभिनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते किरण माने यांनी पोस्ट करत सत्ताधाऱ्यांवर खरमरीत शब्दात टीका केली आहे.

किरण माने यांची पोस्ट जशीच्या तशी…
“ईडीचा सापळा फाडून वाघ सुटला! खरा जिगरबाज. बघा रे, ईडीला घाबरून सत्ताधार्यांच्या वळचणीला गेलेल्या भेकडांनो, तुमच्यावर पुढच्या पिढ्या कुत्सितपणे हसणार आहेत. पण या डी.के. शिवकुमार सारख्या सच्चा लढवय्याला डोक्यावर घेऊन नाचणार आहेत. मेंदूत कोरून ठेवा. त्रास सहन करून स्वत्व टिकवणार्या स्वाभिमानी योद्ध्यांची नावं इतिहास सुवर्णाक्षरात कोरतो. लाचारी पत्करून तात्पुरती पदं मिळवणार्या भेकडांना उकीरड्यावर फेकून देतो.काँग्रेस पक्षाचा कर्नाटकातला हा खंदा वीर, द रियल हिरो डी. के. शिवकुमार! माजी उर्जामंत्री… ईडीची चौकशी झेलली छाताडावर. सत्ताधार्यांना भीक घातली नाही. मनी लाँड्रिंगच्या केसेस झाल्या, बदनामी झाली. पन्नास दिवस तुरूंगवास सोसला, सहा वर्ष झुंज दिली आणि काल सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या केसेस ‘बोगस’ असल्याचे सांगत डी. के. शिवकुमार यांची निर्दोष मुक्तता केली!
डी. केंनी इतर कणाहीन नेत्यांप्रमाणे शेपूट घालून सत्तेत प्रवेश केला असता तर मुख्यमंत्रीही झाले असते. पण जनतेत छीथ्थू झाली असती. लोकांच्या नजरेतून कायमचे उतरले असते. पद आणि खोकी येतात तशी जातातही. पण ‘इज्जत’ आणि ‘बाणेदारपणा’ हजारो वर्ष तुमचं नांव टिकवतो!
ईडीची धाड पडली की मिडीयावाल्यांच्या हिंस्त्र झुंडी बदनामी करायला मोकाट सोडली जातात. पण हा वाघ सुटून आल्यावर त्यांच्यावर खोट्या केसेस लादणार्या व्यवस्थेला जाब विचारणारा एकही ‘माई का लाल’ आज मिडीयात शिल्लक नाही. इतिहासातल्या सगळ्यात नीच स्तरावर आपल्या देशाची लोकशाही पोहोचली आहे याचा हा पुरावा. असो.
डी. के. खरंतर तुमची हत्तीवरुन मिरवणूक काढावीशी वाटतीये. तुमच्या संघर्षाला लवून मुजरा घालावासा वाटतोय. एक लक्षात ठेवा, बदनामीचे घाव झेलूनही वर्चस्ववाद्यांपुढे न झुकलेल्या महामानवांना या देशाने कायम मनामेंदूत कोरून ठेवले आहे. आम्हाला त्यासाठी खोटे सिनेमे काढून कुणाची खोटी भलावण करायची गरज नाही. सुर्याला त्याच्या प्रकाशाची जाहिरात नाही करावी लागत. तुम्हाला तुमचा मान आणि आदर पुर्वीपेक्षा हजारपटींनी परत मिळणार. तुमच्या नावात ‘शिव’ आहे. बहुजनांचा आद्य महानायक!
कडकडीत सलाम.