• Wed. Apr 30th, 2025

महायुतीच्या जागावाटपांमध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची अदलाबदल

Byjantaadmin

Mar 7, 2024

मुंबई : महायुतीच्या जागा वाटपामध्ये भाजपकडून सर्वाधिक जागा घेण्याचा कल असल्याने शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये अस्वस्थता असतानाच आता पुन्हा एकदा महायुतीमध्ये नाराजीची चिन्हे आहेत. जागा वाटपामध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची अदलाबदल होणार असल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये अनेक ठिकाणी उमेदवाराला पसंती देण्यात आली आहे, तर काही ठिकाणी पक्षाला पसंती देण्यात आली आहे. 

जागा मिळाल्या तरी भाजपच्या चिन्हावर लढण्याची शक्यता

अशा स्थितीत ज्या ठिकाणी पक्षाला पसंती आहे त्या ठिकाणी उमेदवार बदलला जाणार आहे, तर ज्या ठिकाणी उमेदवाराला पसंती असेल त्या ठिकाणी दुसऱ्या मित्र पक्षाला ती जागा सोडली जाणार आहे. भाजप आणि महायुतीकडून करण्यात आलेल्या अंतर्गत सर्वेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वेक्षणातून आलेल्या माहितीनंतर या निर्णयापर्यंत महायुती आल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुतीमध्ये शिंदे गट आणि अजित पवार गट यांना जागा मिळाल्या तरी त्यांचे काही उमेदवार हे भाजपच्या चिन्हावर लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वादाचा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. 

जागावाटपावरून महायुतीत वादाची ठिणगी 

शिवसेना शिंदे गटाकडून रामदास कदम यांनी भाजपवर घणाघाती हल्ला चढवला आहे. दुसरीकडे छगन भुजबळ यांनी सुद्धा सन्मानाने जागावाटप करावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे जागावाटपावरून महायुतीमध्ये घमासान सुरु आहे. एक दिवसांपूर्वी अमित शाह यांनीमध्ये तीन बैठका घेताना जागावाटपात सबुरीचा सल्ला देताना विजयी होणाऱ्या उमेदवारांवर लक्ष केंद्रित करावे, अशी विनंती केली होती. अमित शाहांच्या दौऱ्यानंतर शिंदे आणि पवार गटाला एक आकडी जागा मिळण्याची चर्चा रंगली आहे. अमित शाहांच्या दौऱ्यानंतर भाजपचे राज्यातील नेते कोअर कमिटीच्या बैठकीसाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. महायुतीच्या जागावाटपावर दिल्लीत शिक्कामोर्तब होणार आहे. 

मात्र जे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या जागांसाठी मुख्यमंत्र्यांकडून आग्रह करण्यात येत आहे, तर अजित पवार गट सुद्धा नऊ जागांसाठी आग्रही आहे. शिंदे गट 13 जागांसाठी आग्रही आहे. हा आकडा लक्षात घेतल्यास शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार जवळपास 22 जागांसाठी आग्रही आहे, तर भाजपला या समीकरणांमध्ये 26 जागा वाट्याला येऊ शकतात. मात्र, भाजप जवळपास 37 जागांवर आपले उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. अशा स्थितीत जर मोठ्या प्रमाणात उमेदवारांची अदलाबदल झाल्यास पुन्हा एकदा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *