लोणावळा : “सुनील शेळके, तू आमदार कुणामुळे झालास हे विसरु नकोस, तुला ज्यामुळे चिन्ह मिळालं, त्या अर्जावर खाली माझी सही आहे. मला शरद पवार म्हणतात, माझ्या वाट्याला कुणी गेलं, तर मी त्याला सोडत नाही” असा सज्जड दम ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भरला आहे. अजित पवार समर्थक आमदार सुनीलअण्णा शेळके यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्याला हजर न राहण्यासाठी काही नेत्यांना धमकवल्याचा आरोप आहे. त्यानंतर पवारांचा संताप झाल्याचं पाहायला मिळालं.

शरद पवार काय म्हणाले?
“तू आमदार कुणामुळे झालास? तुझ्या सभेला इथे कोण आलं होतं? त्या तुझ्या पक्षाचा जुना अध्यक्ष कोण होता? चिन्हासाठी नेत्याची सही लागते, ती माझी आहे. तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विभागातील कार्यकर्त्यांनी, जे तुम्हाला निवडून आणण्यासाठी तळागाळात राबले, घाम गळला, आज त्यांना तुम्ही दमदाटी करता? माझी विनंती आहे… एकदा दमदाटी केली.. आता बास.. पुन्हा असं काही केलं, तर शरद पवार म्हणतात मला… मी या रस्त्याने कधी जात नाही… पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली.. तर सुनील शेळकेंनी..” असं शरद पवार म्हणाले.
सुनील शेळके यांची प्रतिक्रिया काय?
शरद पवार साहेब यांच्याविषयी आजही आदर आहे, उद्याही राहील. त्यांनी असं वक्तव्य का केलं, त्याचं कारण आणि संदर्भ मला माहिती नाही. मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून आजही आणि उद्याही अजित पवार यांच्यासोबत राहीन. शरद पवार यांच्यासोबत असलेले काही स्वयंघोषित नेते माझ्याबाबत वक्तव्य करत आहेत, मी कोणाला दमदाटी केल्याचं कोणी सिद्ध केलं तर मी जाहीर दिलगिरी व्यक्त करेन, अशी प्रतिक्रिया सुनील शेळके यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना दिली. शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्याला हजर राहू नये यासाठी शेळकेंनी फोन करुन धमकावल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर शरद पवारांची संतप्त प्रतिक्रया समोर आली आहे.