लोणावळा : लोकशाहीला संकटात नेहणारा कारभार मोदींकडून सुरू असून सामान्य माणसांचे अधिकार उध्वस्त होतील. त्यामुळं लोकशाही आणि घटनेचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे, तुम्ही सर्वांना यात सहभागी व्हायला हवं, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. लोणावळ्यात कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी मोदींवर जोरदार तोफ डागली.

जागावाटप कधी जाहीर होणार?
दरम्यान, महाविकास आघाडीचे जागावाटप कधी जाहीर होणार याबाबत शरद पवार यांच्याकडून सुतोवाच करण्यात आले आहेत. पवार म्हणाले की, मविआची बैठक झाली आहे. पुढील आठवडाभरात आम्ही लोकसभेचे उमेदवार जाहीर करू. तुम्ही त्या उमेदवारांना निवडून द्या, तेव्हाच लोकशाहीचे रक्षण होईल असे आवाहन त्यांनी केले.
अरविंद केजरीवाल यांनाही लवकरच अटक केली जाईल
पवार यांनी मोदी सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. ते म्हणाले की, सत्तेचा गैरवापर भाजप करत आहे. झारखंड, दिल्ली या राज्यात तेच घडत आहे. नोटीस, समन्स द्यायचे आणि तुरुंगात टाकायचे, आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही लवकरच अटक केली जाईल, असेही ते म्हणाले.
अशोक चव्हाण पंधराव्या दिवशी खासदार झाले
त्यांनी सांगितले की, मुंबईत आदर्श सोसायटीमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा हात आहे. असा आरोप भाजपने केला. सातव्या दिवशी ते भाजपमध्ये गेले आणि पंधराव्या दिवशी ते भाजपचे खासदार झाले. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भ्रष्टवादी पक्ष म्हणाले. मोदींनी राज्य सहकारी बँक आणि जलसंपदा विभागात घोटाळा केला. असा आरोप मोदींनी केल्यावर मी म्हणालो हिंमत असेल, तर चौकशी करा. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ दे, पण मोदींनी चौकशी करावी. मात्र घडलं काय, ज्यांच्यावर आरोप केले आज ते भाजपमध्ये आहेत. त्यामुळं भाजप म्हणजे वॉशिंग मशीन झालेली आहे. आरोप करा आणि त्यांना पक्ष प्रवेश देऊन आरोप धुवून काढा.
पण त्या वाघिणीवर मोदी बोलत आहेत
ते म्हणाले की, नरेंद्र मोदींचे कालचे (7 मार्च) भाषण पहा, ते बंगालमध्ये होते. तिथं ममता बॅनर्जीवर बोलले. ममता आणि मी एकत्र काम केलं. त्यांच्या घरी मी गेलो आहे. मुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्री असणाऱ्या ममता यांचं घर अगदी छोटं, अशा वाघिणीवर जनता कायम विश्वास ठेवत आली आहे, पण त्या वाघिणीवर मोदी बोलत आहेत, हे कायद्याच्या चौकटीत बसत नाही, मोदींना हे शोभत नाही, अशी टीका त्यांनी केली.