• Tue. Apr 29th, 2025

जंगम समाजातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रतिभावान विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी समाजाने पुढे यावे : डॉ. मल्लिकार्जुन महास्वामीजी   

लातूर :  जंगम समाजातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रतिभावान विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी समाजाने स्वतःहून पुढे यावे. त्यांच्या माध्यमातून आपल्या समाजाचे अनेक उच्च पदस्थ अधिकारी राष्ट्र आणि समाजाच्या सेवेत सहभागी होऊ शकतात असे प्रतिपादन काशीपीठाचे  जगदगुरु श्री श्री श्री १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य महास्वामीजी यांनी केले. 

                     लातूर सकल  जंगम समाजाच्या वतीने लातूर जिल्ह्यातील भूमिपुत्र अधिकाऱ्यांचा गौरव आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात उपस्थितांना आशिर्वचन  करताना  जगदगुरु बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे ह्या होत्या. या सोहळ्यास हिरेमठ संस्थान औसाचे श्री श्री  १०८ डॉ. शांतविरलिंग  शिवाचार्य स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यात छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, आयकर सह आयुक्त डॉ. शांतेश्वर स्वामी, पोलीस अधीक्षक हरेश्वर स्वामी, आयइएस धानेश  स्वामी, प्रशांत स्वामी, उपमहालेखाकार शुभम स्वामी, केंद्रीय रेल्वेचे उपमुख्य अभियंता शिवकुमार मळभागे , उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, डॉ. रवींद्र मठपती, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी,न्या. संदीप स्वामी, कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी, उपसंचालक रविशंकर सावळे, तहसीलदार सौ. सुरेखाताई स्वामी, डॉ. गणेश स्वामी, डॉ. सचिन बालकुंदे, डॉ. महेश अरदाले, डॉ.अरुण बालकुंदे, डॉ. रुद्रमणी स्वामी, डॉ. बसवराज स्वामी, सहायक कार्यकारी अभियंता सुरज स्वामी, इंजि. शांतनू कोळळे , जीएसटी सहायक आयुक्त  आनंद स्वामी, सहायक शिक्षण संचालक दत्तात्रय मठपती, कक्ष  अधिकारी सौ. स्नेहा सावळे जेवरे, उपविभागीय अभियंता अमित स्वामी, सायक अभियंता प्रसाद स्वामी, सहायक अभियंता सौ. शिवनंदा  स्वामी यांचा जगदगुरु तसेच मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. 

                                          आपल्या आशिर्वचनात  जगदगुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य महास्वामीजी पुढे म्हणाले की, प्रत्येकाने आपल्या व्यस्ततेतून समजला शक्य तेवढा वेळ काढण्याचा प्रयत्न करावा. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना  आपल्या समाजाप्रती असलेली तळमळ पाहून अत्यंत समाधान वाटले. उच्च पदावर कार्यरत असतानाही कोणताही गर्व नाही. समाजासाठी सतत काहीतरी करण्याची धडपड सर्वांना  प्रेरित करून गेली. समाजाने आपल्याला काय दिले असे म्हणण्याऐवजी समाजासाठी आपण काय केले ?  हा विचार पुढे यायला हवा,तरच समाज प्रगतीपथावर जाऊ शकतो. केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या स्पर्धा परीक्षेत समाजातील मुले जास्तीत जास्त संख्येने पुढे आली पाहिजेत. त्यांना समाजाने मदत करण्यासाठी पुढे आले पाहिजे. जंगम समाज  आर्थिकदृष्ट्या  सदृढ नाही, ७५ टक्के समाज गरीब आहे. गरिबीमुळे होतकरू विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय होणार नाही याची जबाबदारी समाजातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे. यासाठी वर्षातून दोन तीन वेळा एकत्रित येऊन विचारविनिमय व्हावा. या पुरस्काराने समाजाचे ऋण  आपल्यावर अधिक पडले आहे याची जाणीव ठेवून कार्यरत रहावे असे आवाहनही त्यांनी केले. 

                छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्याला राज्यभरातील जंगम समाजाच्या होतकरू, प्रतिभावान विद्यार्थ्यांना एमपीएससी, यूपीएसी सारख्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. केवळ प्रशासकीय क्षेत्रात जाऊ इच्छिणारेच नव्हे तर उद्योजक म्हणून यशस्वी होऊ इच्छिणाऱ्यांनाही  आपण याबाबतीत सहकार्य करण्यास तयार आहोत. आपला समाज प्रगतीपथावर कसा जाईल याकरिता आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले. आजघडीला समाज  सामाजिक तत्त्वापासून दूर चालला आहे. नव्या पिढीला धर्माच्या आचरणाकडे वळण्यास  प्रवृत्त करणे आवश्यक आहे. भावी पिढीला धर्माच्या  ज्ञानासह अभ्यासही असणे  आवश्यक आहे. आपण अनेक ग्रंथांचे पारायण करतो, संतांचे विचार  कोणत्या ग्रंथात काय आहे,  हे नव्या पिढीला सांगितले पाहिजे. भावी पिढीला धर्माचे आचरण, शिकवण देणे खूप महत्वाचे आहे  याकामी पुढाकार घेणाऱ्यांना  सहकार्य केले पाहिजे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत. लातूर जिल्हा जंगम समाजाचे काम अत्यंत उल्लेखनीय आहे.   शिवपाठावर लिहिलेल्या आपल्या पुस्तकात शिवपाठ नामस्मरणाचे वैज्ञानिक महत्व  मांडण्याचा प्रयत्न केला आहे.  नामस्मरणाचे  एक आगळे वेगळे महत्व विशद करण्याचा प्रयत्न आपण केल्याचे स्वामी सांगितले. 

शांतविरलिंग  शिवाचार्य स्वामी यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामागची पार्श्वभूमी थोडक्यात विशद केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सुधीर मठपती यांनी केले. अध्यक्षीय समारोपात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी लातूर जिल्हा सकल  जंगम समाजाच्या वतीने अत्यंत सर्वांगसुंदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले. समाजाच्या सर्वंकष प्रगतीसाठी समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांनी एकत्रित येणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. 

  कार्यक्रमाचे सूत्रसंचलन  शिवकांत  स्वामी गुरुजी यांनी तर आभार प्रदर्शन नागेश स्वामी  यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  उद्योजक श्रीकांत हिरेमठ, जगदीश स्वामी, चंद्रशेखर स्वामी हुंडेकरी, सुभाष स्वामी देवणीकर , नागेश स्वामी मानखेडकर, प्रा. सुधीर मठपती, अजित मठपती, डॉ. सचिन बालकुंदे, सुहास स्वामी, इंजि. विवेक स्वामी, डॉ. संजय स्वामी, डॉ. शिवाजी काळगे, संतोष स्वामी यांसह समाज बांधवांनी परिश्रम घेतले.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed