मनपाचे शिलकी अंदाजपत्रक सादर विविध मूलभूत गरजांसाठी मोठी तरतूद
लातूर/प्रतिनिधी: लातूर शहर महानगरपालिकेचे सन २०२३-२४ चे सुधारित आणि २०२४-२५ चे मूळ अंदाजपत्रक मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी सोमवार दिनांक ४ मार्च रोजी जाहीर केले.आयुक्तांनी सादर केलेल्या या शिलकी अंदाजपत्रकात विद्युत विभाग,बांधकाम विभाग, आरोग्य विभाग तसेच पाणीपुरवठा विभागासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे.

आयुक्त मनोहरे यांनी सादर केलेल्या या अंदाजपत्रकात पालिकेला यावर्षी 839 कोटी 83 लक्ष रुपये उत्पन्न अपेक्षित असून या वर्षात 839 कोटी 58 लक्ष रुपये खर्च होणार आहे.
यावर्षी मनपाने सादर केलेल्या अंदाजपत्रकात विद्युत विभागातील साहित्य खरेदी व देखभाल दुरुस्तीसाठी 40 लाख रुपये तसेच पथदिवे व वीज बिलासाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.शहरात एलईडी दिवे बसवण्यासाठी 50 लाख तर ट्रॅफिक सिग्नल देखभाल व दुरुस्तीसाठी १५ लाख रुपयांची तरतूद मनपाने केली आहे. रुग्णालय व दवाखान्यांसाठी 31 लाख खर्च अपेक्षित आहे. मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी कोंडवाड्यावर 66 लाख 50 हजार रुपये खर्च केला जाणार आहे तर सार्वजनिक उद्यानासाठी एक कोटी 25 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बांधकाम विभागात रस्ते व गटार दुरुस्तीसाठी दोन कोटी, शैक्षणिक विषयासाठी दोन कोटी 74 लाख 80 हजार रुपये तर ग्रंथालयांसाठी दोन कोटी 24 लाख 20 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अपंग कल्याण निधी महिला व बालकल्याण तसेच मागासवर्गीय दुर्बल घटकांसाठी अंदाजपत्रकाच्या पाच टक्के म्हणजे प्रत्येकी 66 लाख 73 हजार 443 रुपये तरतूद केली गेली आहे.नवीन रस्त्यांसाठी दोन कोटी रुपये, नवीन गटारांची कामे व दुरुस्तीसाठी दोन कोटी तसेच मान्यवरांचे पुतळे व कमानी उभारणे तसेच त्याची निगा राखण्यासाठी 25 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.पंपिंग केंद्रावरील साहित्य खरेदीसाठी 15 लाख रुपये,नवीन पाईपलाईनसाठी 50 लाख रुपये तर पाणीपुरवठा योजनेसाठी ही 50 लाख रुपये तरतूद मनपाने केली आहे.
पालिकेला मिळणाऱ्या एकूण उत्पन्नामध्ये केंद्र शासनाच्या विविध अनुदानाचा वाटा 35 टक्के तर राज्य शासनाकडून होणारी भांडवली जमा 17 टक्के अपेक्षित आहे.त्या खालोखाल कर्ज व निधीच्या माध्यमातून 11 टक्के, मालमत्ता पासून होणारे उत्पन्न 9 टक्के, विविध अनुदाने व अंशदानामधून सात टक्के तर पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून सहा टक्के उत्पन्न अपेक्षित आहे. मनपाला मिळणाऱ्या करामधूनही सहा टक्के उत्पन्न गृहीत धरण्यात आले आहे.असाधारण ऋण व निलंबन जमा मधून पाच टक्के तसेच विशेष अधिनियमाखाली होणाऱ्या वसुलीतून दोन टक्का रक्कम जमा होणार आहे.
या वर्षात पालिका केंद्र शासनाचे विविध अनुदान खर्च करणार असून त्याचे प्रमाण ३३ टक्के आहे. त्या खालोखाल राज्य शासनाच्या भांडवली खर्चासाठी १९ टक्के खर्च होणार आहे.कर्ज व निधीसाठी ११ टक्के, असाधारण ऋण व निलंबन लेखेसाठी सहा टक्के खर्च होणार आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागासाठी पाच तर महसुली भांडवली खर्चासाठी चार टक्के खर्च केला जाईल.या खालोखाल तीन टक्के संकीर्ण खर्च,सार्वजनिक सुरक्षिततेसाठी एक टक्का खर्च होणार आहे.
आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी अंदाजपत्रक सादर करताना मुख्यलेखाधिकारी रावसाहेब कोलगणे, मुख्य लेखापरीक्षक कांचन तावडे, लेखाधिकारी, समद शेख यांच्यासह पालेकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.