• Tue. Apr 29th, 2025

ग्रंथ हे आपल्या जीवनात मार्गदर्शकाची भूमिका बजावितात –  रमेश बियाणी

Byjantaadmin

Mar 5, 2024

‘लातूर ग्रंथोत्सव’चे थाटात उद्घाटन

ग्रंथ हे आपल्या जीवनात मार्गदर्शकाची भूमिका बजावितात –  रमेश बियाणी

·        ग्रंथदिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद

·        दोन दिवस ग्रंथ प्रदर्शन व विक्री दालन

लातूर (जिमाका): ग्रंथ हे आपल्याला भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळविषयक ज्ञान देतात. आपली संस्कृती, समाजाची जडणघडण ग्रंथांमुळे समजते. त्यामुळे ग्रंथ हे मानवी जीवनात मार्गदर्शकाची भूमिका बजावितात, असे प्रतिपादन दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी यांनी केले. दयानंद सभागृहात लातूर ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते  बोलत होते.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य व लातूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लातूर ग्रंथोत्सवचे उद्घाटन ग्रंथालय चळवळीचे प्रणेते डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी, वात्रटिकाकार भारत सातपुते हे होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के, ज्येष्ठ साहित्यिक रमेश चिल्ले, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर, विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राम मेकले, जिल्हाध्यक्ष प्रभाकर कापसे, दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव गायकवाड, साने गुरूजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कालिदास माने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मानवी जीवनात प्रगतीचे विविध टप्पे आले. या सर्व टप्प्यांचे ग्रंथ हे साक्षीदार आहेत. आपली संस्कृती, सभ्यता विकसित होण्यामध्ये ग्रंथची भूमिका महत्वाची राहिली आहे. आपल्या विचारांची जडणघडण होण्यामध्ये ग्रंथ दिशादर्शक ठरतात. त्यामुळे प्रत्येकाने ग्रंथ वाचनाची आवड जोपासली पाहिजे. ग्रंथोत्सवासारखे उपक्रम हे वाचन चळवळ वाढविण्यासाठी आणि युवा वर्गात वाचनाची गोडी वाढविण्यासाठी आवश्यक असल्याचे श्री. बियाणी यावेळी म्हणाले.

आयुष्यात ग्रंथ हा महत्वाचा घटक आहे. ग्रंथांशी घट्ट मैत्री केल्यास आपल्याला जगण्याचे बळ, नवी दिशा आणि नव्या प्रेरणा मिळतात. त्यामुळे आयुष्यात इतर अनावश्यक बाबींपेक्षा ग्रंथ वाचनाला अधिक महत्व दिले पाहिजे, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी भारत सातपुते यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या जीवनातील ग्रंथांची भूमिका विषद केली.

वाचकांची मानसिकता बदलत असून वाचन चळवळ वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेणे आवश्यक आहे. प्रत्येकाने स्वतःपासूनच ग्रंथ वाचनाची आवड जोपासण्यास सुरुवात करावी. प्रत्येकाच्या अभिरुचीनुसार ग्रंथ वाचनालयात उपलब्ध करून द्यावे लागतील. ग्रंथालय हे केवळ पुस्तकालय न बनता ग्रंथालयांनी वाचन प्रसारासाठी नवनव्या उपक्रमांशी जोडून घ्यावे. आव्हाने सर्वच क्षेत्रात आहेत, वाचन चळवळ त्याला अपवाद असण्याचे कारण नाही, असे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यावेळी म्हणाले.

युवा पिढीला वाचनाची गोडी लावण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांमार्फत गावोगावी उपक्रम राबविले जावेत. या ग्रंथालयांनी वाटाड्याची भूमिका निभावत वाचक घडवावेत. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाल्यास वाचन चळवळ वाढीस लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तिकांसोबत इतरही वाचनासाठी प्रोत्साहित करावे, असे बाल साहित्यकार रमेश चिल्ले यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के यांनी केले. यामध्ये त्यांनी ग्रंथोत्सवाच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी.सी. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन हरिश्चंद्र डेंगळे यांनी केले. ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. यामध्ये विविध प्रकाशनांच्यावतीने ग्रंथदालने उभारण्यात आली आहेत. या ग्रंथदालनामधून विविध प्रकारचे ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध आहेत .

ग्रंथदिंडीने उत्साहात सुरुवात

‘लातूर ग्रंथोत्सव’ची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कपासून झाली. ग्रंथदिंडीचे पूजन जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष डॉ. ब्रिजमोहन झंवर, डॉ. आरती झंवर, प्राचार्य डी.एन. केंद्रे, कालिदास माने, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथदिंडीत साने गुरुजी विद्यालय, राजमाता जिजामाता विद्यालय, श्री विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने विविध वेशभूषेत सहभागी झाले होते. या ग्रंथदिंडीने लातूर शहरवासियांचे  लक्ष वेधून घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed