• Wed. Apr 30th, 2025

निरोगी जीवनासाठी व्यसनापासून दूर राहणे आवश्यक – जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.

Byjantaadmin

Dec 9, 2022

निरोगी जीवनासाठी व्यसनापासून दूर राहणे आवश्यक
– जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.

लातूर(जिमाका) : कोणत्याही प्रकारचे व्यसन हे शरीरासाठी हानिकारक असते. त्यामुळे सदृढ व निरोगी जीवनासाठी व्यसनापासून दूर राहणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग व जीवनरेखा प्रतिष्ठान (एकात्मीक व्यसनमुक्ती केंद्र) यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे आयोजित व्यसनमुक्ती जनजागृती चित्रप्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव, समता पर्व, नशामुक्त भारत अभियान व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.

समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, सहाय्यक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. गवळी उपस्थित होते. तंबाखू, मद्यपान व धुम्रपान विरोधी चित्रांचा समावेश असलेल्या चित्रप्रदर्शनात महाविद्यालयातील युवक- युवती व शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीला.

युवक-युवतींना व्यसनापासून दूर राहावे. तसेच सक्षम समाज घडविण्यासाठी नशामुक्त भारत अभियानामध्ये पुढाकार घेवून कार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी केले.
श्री. नाईकवाडी यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. चित्रप्रदर्शन यशस्वी करण्यासाठी समाज कल्याण विभागातील अधिकारी, कर्मचारी, तसेच जीवन रेखा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार यादव आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed