मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग आणि पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचे गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात आता देशमुखांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठे आरोप केले आहे. खंडणीचे आरोप फडणवीस यांनीच करायला लावल्याचा आरोप देशमुखांनी केला आहे. सरकारने चांदीवाल अहवाल जनतेसमोर सादर करण्याची मागणीही अनिल देशमुख यांनी केली आहे.अकोल्यात मीडियाशी बोलताना DESHMUKH यांनी आज फडणवीसांवर निशाणा साधला. महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते देशमुख हे गृहमंत्री असताना त्यांच्यावर परमबीर सिंग आणि वाझे यांनी 100 कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचे आरोप केले होते. सिंग यांनी केलेले आरोप फडणवीस यांच्या सांगण्यानुसार केले, असा गंभीर आरोप देशमुख यांनी त्यांचे नाव न घेता केला आहे.शंभर कोटीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले होते. त्यानंतर माजी न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या आयोगाचा अहवाल हा दीड वर्षापूर्वीच आला होता. मात्र सरकारने तो अद्यापही विधानसभेच्या पटलावर ठेवला नसल्याचे देशमुख म्हणाले. मी याबाबत राज्यपाल यांनाही पत्र लिहिलं आहे. मात्र त्यांनी देखील यात लक्ष घातले नसल्याचा आरोपही देशमुख यांनी केला आहे.

अधिवेशन संपलेलं असलं तरी पुढील काळात तो अहवाल शासनाने सादर करावा, अशी मागणीही देशमुख यांनी केली आहे. दरम्यान, चांदीवाल अहवाल सादर केला जाऊ नये, म्हणून यामागे विदर्भातील मोठे नेते असल्याचा दावा ही अनिल देशमुख यांनी केला आहे. वेळ आल्यानंतर मी त्यांचे नाव सुद्धा सांगेल, असेही देशमुख म्हणाले. राज्यातील भाजपच्या एका बड्या नेत्याने मला प्रतिज्ञापत्र करून देण्यास सांगितले होते. त्यांनी म्हटलं होतं की, तुम्ही प्रतिज्ञापत्र करून द्या, ईडी, सीबीआय यांची चौकशी होणार नाही. मला माझ्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर सुद्धा त्यांनी आरोप करण्यास सांगितले होते. मी जर ते ऐकलं असतं आणि केलं असतं तर सरकार कोसळलं असतं. मी याबाबत माहिती योग्यवेळ आली की सादर करेल असेही देशमुख म्हणाले.