मुंबई: लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. लोकसभेच्या जागांनुसार, सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात ५१ उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली. तर महाराष्ट्रातून एकही नाव अद्याप ठरलेलं नाही. महाराष्ट्रातून अद्याप एकही उमेदवार न दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. लोकसभेच्या जागावाटपावरुन महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाचं एकमत होत नसल्याचं बोललं जात आहे. लोकसभेच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा ही भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केली. पण, ते स्वत:च्याच राज्यातील उमेदवार जाहीर करु शकले नाहीत. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत.

जागावाटपावर चर्चा सुरु
भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितलं की, महाराष्ट्रात भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटासोबत लोकसभा निवडणूक लढणार आहे. सध्या जागा वाटपबाबत चर्चा सुरु आहे. जागा वाटप निश्चित झाल्यावर महाराष्ट्रातील उमेदवारांची नावं जाहीर केली जातील. चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सांगितलं होतं की राज्यात लोकसभा जागावाटपबाबत महायुतीत चर्चा सुरु आहे. लवकरच याची घोषणा केली जाईल.
कृपाशंकर सिंह यांना उत्तर प्रदेशात उमेदवारी
मुंबईच्या राजकारणातील एक मोठं नाव असलेले माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांना उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथून लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. जौनपूर जागेसाठी मुंबईचेच ज्ञान प्रकाश सिंह देखील इच्छूक होते. गेल्या पाच वर्षांपासून ते तिथे सक्रियपणे काम करत आहेत. पण, पक्षाने कृपाशंकर सिंह यांची निवड केली. जौनपूर ही कृपाशंकर सिंह यांची जन्मभूमी आहे. त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात ही काँग्रेस पक्षाचून झाली होती. काँग्रेसने त्यांना विधानपरिषदेचं सदस्य बनवलं होतं. त्यानंतर त्यांनी कालीना येथून निवडणूक लढली आणि जिंकलीही. त्यानंतर त्यांना गृहराज्यमंत्री बनवण्यात आलं. त्यानंतर त्यांच्याकडे मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपदही देण्यात आलं. मात्र, काही काळाने त्यांच्यात आणि काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि त्यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपात प्रवेश घेतला. त्यांनी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मागितली होती. पण, त्यांना जौनपूरची जागा देण्यात आली.
भाजपचे प्रमुख उमेदवार
वाराणसी – नरेंद्र मोदी (पंतप्रधान)
गांधीनगर – अमित शहा (केंद्रीय गृहमंत्री)
अरुणाचल वेस्ट – किरण रिजिजू
गुना – ज्योतिरादित्य शिंदे
विदिशा – शिवराज सिंह चौहान (माजी मुख्यमंत्री, मध्य प्रदेश)
कोटा – ओम बिर्ला (लोकसभा अध्यक्ष)
अमेठी – स्मृती इराणी
लखनऊ – राजनाथ सिंह
मथुरा – हेमा मालिनी
राज्यानुसार उमेदवारी
उत्तर प्रदेश – ५१
पश्चिम बंगाल – २०
मध्य प्रदेश – २४
गुजरात – १५
राजस्थान – १५
केरळ – १२
तेलंगणा – ०९
आसाम – १२
झारखंड – ११
छत्तीसगड – ११
दिल्ली – ०५
जम्मू् काश्मीर – ०२
उत्तराखंड – ०३
अरुणाचल प्रदेश – ०२
गोवा – ०१
त्रिपूरा -०१
अंदमान निकोबार – ०१
दीव दमण – ०१