• Mon. Apr 28th, 2025

आगामी लोकसभा निवडणूक पूर्वतयारीसाठी लातूर जिल्हयात काँग्रेस पक्षाचे विधानसभा मतदारसंघनिहाय निरीक्षक जाहीर

Byjantaadmin

Mar 2, 2024

आगामी लोकसभा निवडणूक पूर्वतयारीसाठी लातूर जिल्हयात काँग्रेस पक्षाचे विधानसभा मतदारसंघनिहाय निरीक्षक जाहीर



लातूर (प्रतिनिधी )  येत्या काही दिवसात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश
काँग्रेसने राज्यभरात विधानसभा मतदारसंघनिहाय निरीक्षकांची नियुक्ती जाहीर केली आहे. यात लातूर जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघातील निरीक्षक पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आले आहेत.



जिल्ह्यात होणाऱ्या संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागच्या वर्षीच माजी पालकमंत्री आ.अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे व शहर जिल्हाद्यक्ष ऍड.किरण जाधव यांनी लातूर जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघनिहाय निरीक्षकांची नियुक्ती जाहीर केली होती, या निरीक्षकांनी त्यांना नेमून दिलेल्या विधानसभा मतदारसंघात तेव्हापासूनच काम सुरू केलेले आहे,



त्याअगोदर झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळाले होते, त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने नेमलेल्या निरीक्षकांनी, त्या त्या विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नेते, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संघटनांचेपदाधिकारी, नागरिक यांच्या भेटी घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यासंबंधीचा अहवाल ही त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे सादर केलेला आहे.

संबंधित विधानसभा मतदारसंघात निरीक्षकांनी केलेल्या  कामकाजाचा अहवाल लक्षात घेऊन, प्रदेश काँग्रेसनेही थोडा फार बदल करून निरीक्षकांची नियुक्ती केली आहे, ज्यांच्याकडे संघटनेचे महत्त्वाचे पद आहे, किंवा इतर जबाबदारी आहे त्यांना नियमित कामात वेळ मिळावा म्हणून तेथे दुसऱ्या  पदाधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती प्रदेश काँग्रेसने केली आहे.

आगामी लोकसभा निवडणूकीसाठी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी लातूरचे माजी पालकमंत्री आ.अमित विलासराव देशमुख यांच्याशी चर्चा करून या नवीन निरीक्षकांची नियुक्ती जाहीर केली आहे. यात लातूर शहर मतदारसंघात रेना कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे,अहमदपूर मतदार संघात
लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, उदगीर विधानसभा मतदारसंघात विलास सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रविंद्र काळे, निलंगा विधानसभा मतदार संघात माजी महापौर ऍड.दीपक सूळ,औसा विधानसभा मतदार संघासाठी विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष ऍड.समद पटेल आणि लातूर ग्रामीण विधानसभा  मतदार संघासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अनुप शेळके यांची
नियुक्ती करण्यात आली आहे.  काँग्रेस पक्षाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेले हे प्रभारी जिल्हाभरातील
पक्षाचे ज्येष्ठ नेते,केंद्रिय तसेच राज्यस्तरावरील पक्षाचे पदाधिकारी,स्थानीक पातळीवरील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना यांचे प्रतिनिधी,नागरीक यांच्याबरोबर चर्चा करून पक्षाची बांधणी करतील,प्रभावी बूथ यंत्रणा उभारतील यासंबंधीची नियमित माहिती पक्षश्रेष्ठींना देतील असे  जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे व शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ऍड. किरण जाधव यांनी संयुक्तरीत्या प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed