लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही काही दिवसांतच होऊ शकते. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या राजकारणात ‘अब की बार किसान सरकार’ असा नारा देत गुलाबी स्वप्न घेऊन आलेल्या तेलंगणातील भारत राष्ट्र समितीने धुमाकूळ घातला होता. आपल्या पक्षाचे चिन्ह असलेल्या कारचा ताफा घेऊन तेलंगणाचे तत्कालीन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी धुराळा उडवून दिला होता.

तेलंगणा राज्यातील सत्ता गमावल्यानंतर काही काळ maharashtra तील राजकारणापासून अलिप्त राहिलेल्या बीआरएस पक्षाची कार लोकसभा निवडणुकीत सुसाट वेगाने रेसमध्ये धावण्यासाठी तयार झाली आहे. चंद्रशेखर राव यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी काल झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघातउमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला.राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला असला तरी, मोजक्या दहा लोकसभा मतदारसंघात पक्ष ताकदीने उभा राहणार आहे. यात मराठवाड्यासह खान्देश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई, ठाणे जिल्ह्यातील एका लोकसभा मतदारसंघात बीआरएस जोर लावणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून बीआरएसच्या भूमिकेकडे राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे लक्ष लागले होते. त्याहीपेक्षा बीआरसचे राज्यातील पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष काय निर्णय घेतो? याच्या प्रतिक्षेत होते. केसीआर यांनी निवडणुकीच्यादृष्टीने बोलावलेल्या पहिल्याच बैठकीत राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघात पक्ष ताकदीने निवडणूक लढवणार असल्याची जाहीर केले.
बीआरएस प्रस्थापित पक्षांना सुरूंग लावणार
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली तर विदर्भातील दोन लोकसभा मतदारसंघात तसेच खान्देश व मुंबई ठाण्यातील प्रत्येकी एक लोकसभा मतदारसंघात उमेदवारांचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा लढतीत बीआरएसचीही भर पडणार आहे.गेल्या सहा महिन्यांपासून पक्ष पातळीवर स्मशान शांतता असलेल्या बीआरएसमध्ये आता उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे. दरम्यान केवळ लढवायची म्हणून निवडणूक लढवणार नसून इतर पक्षातील काही मोठे नेते बीआरएस कडून लढण्यास इच्छुक असल्याचे महाराष्ट्रातील पक्षाचे नेते khadir मौलाना यांनी सांगितले.
मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, जालना आणि संभाजीनगर या प्रमुख लोकसभा मतदारसंघात पक्ष राजकीय दृष्ट्या सक्षम आणि शक्तिशाली असलेल्या उमेदवारांनाच मैदानात उतरवणार आहे. अनेक पक्षातील मोठे नेते संपर्कात आहेत. लवकरच माजी मुख्यमंत्री केसीआर हे उमेदवारांच्या नावांची घोषणा करतील. मध्यंतरी चंद्रशेखर राव यांची प्रकृती बरी नसल्यामुळे राज्यातील पक्षवाढीकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले. हे जरी खरे असले तरी बीआरएस लोकसभा निवडणूक अत्यंत गांभीर्याने आणि ताकतीने लढवणार आहे, असेही मौलाना यांनी स्पष्ट केले.