• Mon. Apr 28th, 2025

आप गये, अच्छा किये!

Byjantaadmin

Feb 27, 2024

आप गये, अच्छा किये!

कॉंग्रेसमध्ये निष्क्रिय झालेले बसवराजही भाजपाच्या फुग्यात हवा भरायला सरसावले; पण हा फुगा लवकरच फुटणार!.

कॉंग्रेसचे माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांची अलिकडच्या काळातील पक्ष-संघटनेबाबतची लक्षणं काही ठिक दिसत नव्हती. म्हणूनच दि.०७ सप्टेंबर, २०२२ रोजी “उमरग्यातील बडे कॉंग्रेसवाले झोपले आहेत काय? मग आपण काय केले पाहिजे?” या मथळ्याखाली यापूर्वी लेख लिहिला होता. पण ते झोपले नव्हते तर त्यांनी झोपेचे सोंग घेतलेले होते, हे आता त्यांनी कॉंग्रेसच्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देवून भाजपात प्रवेश करणार असल्याबाबतच्या बातम्या धडकल्यावर स्पष्ट झाले आहे.

उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार खालेकमियॉं काझी यांच्या मृत्यूपश्चात कॉंग्रेसची धुरा बसवराज पाटील यांच्याकडे गेली. त्यांनी पक्षासाठी चांगले काम केले. पक्षानेही त्यांना भरभरून दिले. ते एक वेळा उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार, दोन वेळा औसा मतदारसंघाचे आमदार राहिले. पक्षाने त्यांना राज्यमंत्री पदही दिले. कॉंग्रेसची चलती असतानाच्या काळात त्यांनी शिक्षणसंस्थांचा विस्तार आणि सहकारी साखर कारखान्याची स्थापनाही केली. सन २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत त्यांचा औसा मतदारसंघातून भाजपाच्या अभिमन्यू पवार यांनी पराभव केल्यानंतर पक्षाने त्यांना प्रदेश कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. त्यांचा मुलगा युवक कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निवडून आला. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, संसदरत्न शिवराज पाटील-चाकुरकर हे बसवराज पाटील यांना त्यांचे मानसपुत्र मानत असत. कॉंग्रेससोबत अनेक वर्षांचे असे घट्ट ऋणानुबंध असतानाही अलिकडच्या काळात कॉंग्रेस केंद्रात आणि राज्यात संघर्ष करीत असताना बसवराज पाटील मात्र संपूर्ण ताकतीने कॉंग्रेससोबत नसल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते. केंद्रात मोदी-शहा जोडगळीने हैदोस घातला. नोटाबंदी, जीएसटी करप्रणालीची अचानक आणि पूर्वतयारीशिवायची अंमलबजावणी, सैनिकांच्या योगदानाचेही निवडणूकांच्या आखाड्यातून श्रेय लाटणे, सत्तेत येण्याआधी काळ्या पैशांविरुद्ध बोंब ठोकूनही सत्तेत आल्यानंतर त्याबाबत काहीच कारवाई न करणे उलट निवडणूकांत अशी आश्वासने म्हणजे जुमलाबाजी करावीच लागते असे बिनदिक्कत सांगणे, ई.डी.-सी.बी.आय-इन्कम टॅक्स आदी स्वायत्त संस्थांच्या गळ्यात सत्तेच्या बळाचे पट्टे घालून आपल्या मनाप्रमाणे वापर करणे, विरोधकांवर सूडबुद्धिने कारवाया करणे, देवा-धर्माचा वापर आपले राजकारण रेटण्यासाठी सर्रासपणे करणे, सार्वजनिक मालकीच्या कंपन्यांची विक्रि आपल्या हितसंबंधीयांना किरकोळ भावात करणे, धनिकधार्जिने व कष्टकरीविरोधी धोरणे बिनदिक्कत आखणे अशी हुकुमशाहीस पुरक अनेक कारस्थानं करुन भाजप्रणित मोदी सरकारची वाटचाल सुरु आहे. याविरुद्ध जनतेत उतरुन जन आक्रोश निर्माण करणे, त्याला दिशा देणे, विविध आंदोलने उभी करणे, संविधानाची पायमल्ली होत असताना जनतेत उतरुन संविधानाचा जागर करणे, पक्ष-संघटन बळकट करणे, पक्ष-संघटनेचा विस्तार करणे, समविचारी लोकांशी जुळवून घेत त्यांना पक्षासोबत जोडून घेणे, देश-राज्य-स्थानिक पातळीवरील विविध विषयांना वाचा फोडणे, सत्तेतल्यांचा भ्रष्टाचार उघडा पाडणे अशी कामे कॉंग्रेसच्या नेतृत्वाकडून अपेक्षित होती. यापैकी कुठल्याही आघाडीवर बसवराज पाटील कधी दिसले नाहीत. ते फक्त शिक्षणसंस्था, साखर कारखाना सांभाळण्याच्या त्यांच्या दैनंदिन कामात होते, फार तर पक्षाच्या कार्यक्रमांना औपचारिकता म्हणून हजर राहत होते. 

मोदी मानहानी प्रकरणावरुन राहुल गांधींना सजा सुनावण्यात आली, त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. याबाबत देशभर आंदोलने झाली. पण बसवराज पाटील यांच्या पुढाकाराने व उपस्थितीत आंदोलने छेडली गेले नाहीत. 

मागच्या काही महिन्यांपासून ते कॉंग्रेस सोडून भाजपाच्या गोटात जाणार असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगत होत्या. खरं तर पक्षात महत्वाच्या पदावर असूनही निष्क्रिय असणाऱ्या आणि भाजपात प्रवेशाच्या चर्चा असणाऱ्या नेत्याला कॉंग्रेसनेच पक्षातून काढून टाकायला हवे होते. पण आपल्या जुन्या नेत्याचा पुरेपुर सन्मान कॉंग्रेसने शेवटपर्यंत केला. नेत्याने मात्र पक्षाला ऐन संघर्षाच्या काळात एकटे पाडले हे वास्तव काही केल्या पुसले जाणार नाही. 

उमरगा-लोहारा मतदारसंघात सन २००९ पासून शिवसेनेची सत्ता आहे. सन २००९ ते २०२४ या पंधरा वर्षाच्या कालखंडातील महाविकास आघाडीचा अडीच वर्षांचा कार्यकाळ वगळला तर बसवराज पाटील हे या मतदारसंघातील प्रमुख विरोधी नेते होते. पण या सबंध कालखंडात त्यांनी स्थानिक प्रश्नांना वाचा फोडणे, विरोधकाच्या भूमिकेतून स्थानिक आमदारांच्या चुकीच्या कृत्यांना, धोरणांना व उणीवांना उघडे पाडण्याचे काम सचोटीने केले नाही. सन २००९ च्या विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेसचे उमेदवार असलेल्या डॉ. बी. पी. गायकवाड यांच्या पराभवास खुद्द बसवराज पाटीलच जबाबदार असल्याचा आरोप डॉ. बी. पी. गायकवाड यांनी त्यांच्या ‘माझी संघर्षगाथा’ या आत्मकथनपर पुस्तकात केला आहे.

काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसमधील उमरग्याच्या एका ज्येष्ठ नेत्याने बसवराज पाटील कॉंग्रेस सोडून जाणार नाहीत, गद्दारी त्यांच्या रक्तात नाही, ते पक्ष सोडणार नसल्याचे वचन त्यांनी दिले आहे असे एका यू-ट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. पण त्या मुलाखतीची बातमी होवू दिली गेली नाही. याचाच अर्थ बसवराज पाटील यांच्या पोटात आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या अंतर्गत गोटात काही वेगळेच शिजत होते. 

काल बसवराज पाटील यांनी कॉंग्रेसच्या पदाचा राजीनामा दिला आणि ते लवकरच भाजपात जाणार असल्याच्या बातम्याही झळकल्याने आधीच्या चर्चांना आता अधिकृतपणे दुजोरा मिळाला आहे. 

‘बसवराज पाटील यांच्या जाण्याने कॉंग्रेसला खिंडार’ अशा पद्धतीने या बातम्या रंगवल्या जात होत्या. पण मूळात जो नेता पक्षात असूनही निष्क्रिय होता त्याच्या जाण्याने पक्षाला खिंडार वगैरे पडेल असे काही वाटत नाही. त्यांच्यासोबत त्यांच्या व्यक्तिगत फळीतील काही कार्यकर्ते पक्ष सोडून जातीलही परंतू संविधानावर विश्वास असणारे, लोकशाहीवर निष्ठा असणारे आणि देशातील हुकुमशाहीचे संकट कळालेले बहुतांश लोक हे भाजपविरोधात लढत राहतील. उलट बसवराज पाटील यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला ते चांगलेच झाले. एवढे दिवस पक्षात राहूनही निष्क्रिय राहत, इतर पक्षात जाण्याचे गणित बांधत त्यांनी पक्षाचा विश्वासघात केलाच होता. तो अधिक काळ करीत राहण्यापेक्षा पक्षातून बाहेर पडलेले कधीही चांगले. एखादे महत्वाचे पद अडवून ठेवण्यापेक्षा ते रिकामे करुन इतरांना त्या जागी बसून चांगले काम करण्याची संधी देणे कधीही चांगले. म्हणून कॉंग्रेस पक्षात असूनही नसल्यासारखे असलेल्या बसवराज पाटील यांच्या पक्ष सोडल्याच्या घटनेवर व्यक्त होताना “आप गये, अच्छा किये” असे म्हणण्याची वेळ आली आहे.

उमरगा-लोहारा मतदारसंघातील जनतेने बसवराज पाटील आणि रविंद्र गायकवाड या दोन नेत्यांना मोठे केले. पण दोन्ही नेत्यांनी वेळ साधून आपला पक्ष बदलला. ऐन संघर्षाच्या काळात बसवराज पाटील यांनी कॉंग्रेस सोडली तर संकटात असलेल्या उद्धव ठाकरेसोंबत कालही, आजही आणि उद्याही असं लेखी सांगणाऱ्या शब्दप्रभूंनी शब्द दिल्याच्या काही दिवसांतच शब्द फिरवला. दोन दिग्गज नेत्यांनी एकाच कालखंडात जनतेला दिलेले शब्द फिरवत, देशात हैदोस घालणाऱ्या बलाढ्य सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला हे किती दुर्दैवी आहे?

पण म्हणून जनतेने निराश होवून चालणार नाही. भाजपाच्या फुग्यात हवा भरायला भाजपा सर्वपक्षीय नेते फोडत आहे. विधीमंडळात निवडून गेलेले पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणजेच पक्ष असे सांगत आख्खे पक्षच्या पक्ष बळकावत आहे आणि आपल्या फुग्यात सत्तेची हवा भरण्याच्या कामाला लावत आहे. पण या देशावर बुद्ध, बसवण्णा, कबीर, तुकोब्बा, जिजाऊ, शिवराय, फुले, सावित्री, फातिमा, रमाई, बाबासाहेब, भगतसिंग, आण्णाभाउ यांचे संस्कार आहेत. लोकशाही बुडवायला आणि संविधान संपवायला कितीही दिग्गज एकत्र आले तरी या महामानवांच्या मुशीतून तयार झालेल्या लोकांच्या एकतेची वज्रमूठ सत्तांधांचे मनसुबे उधळवून लावेल. 

आता बसवराज पाटील यांच्या कॉंग्रेस सोडल्यानंतर, त्यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांच्या या निर्णयामागची वेगवेगळी कारणे सांगितली जातील. हा निर्णय जनहितासाठी घेतला गेला, असेही सांगितले जाईल. अलिकडे पक्ष बदलणाऱ्या नेत्यांनी त्यांच्या निर्णयाच्या समर्थनार्थ जशा अनेक नव्या राजकीय तत्वज्ञानांना(!) जन्म घातला तसा नवा किस्सा, नवा विचार रंगवला जाईल. अजित पवारांनी तर एका टीव्ही चॅनलच्या पत्रकाराला ‘तुम्ही जसे चांगली संधी मिळाली की चॅनल बदलता तसा आम्ही पक्ष बदलणे काय गैर?’ असा सवाल करुन पक्ष बदलणे आणि नोकरी बदलणे यात काही फरक नसतो असेही जनतेत रुजवण्याचा प्रयत्न केलाच होता. पण राजकारण ही नोकरी अगर धंदा नसून तो विचारांवर आधारित, देश कसा चालावा याबाबतच्या मुल्यांवर आधारित, समाजातील विविध हितसंबंधांचे संतुलन करण्यासाठी व लोकहित जपण्यासाठी निवडलेला सेवेचा एक मार्ग आहे आणि हेच भारतीय संविधानाला अभिप्रेत आहे, हे जनतेला सांगावे लागेल. सत्ता हे साध्य नसून समाजात समता, न्याय व बंधूता प्रस्थापित करण्याचे साधन आहे याचा विसर नेत्यांना पडलाच आहे पण तो जनतेलाही पडावा यासाठी वेगवेगळ्या कथा रचल्या जात आहेत. भाजप्रणित मोदी-शहा जोडगळी देश कुण्या दिशेने नेत आहे आणि या संघर्षात समाजाने मोठे केलेले नेते काय करीत आहेत, हे जनता बारकाईने पाहत असल्याने स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्या नेत्यांच्या भुलथापांना आता जनता बळी पडणार नाही. 

कॉंग्रेसमुक्त भारत करायला निघालेली भाजपा कॉंग्रेसच्या नेत्यांची घाऊक आवक करुन स्वत: ‘कॉंग्रेसमय’ होत आहे. भाजपाच्या फुग्यात सत्तेची हवा भरण्याचे काम तेजीने चालू आहे. नवनवीन लोक आणून ही हवा भरली जात आहे. पण सत्तांधांनो, लक्षात ठेवा, हा फुगा एकदिवस फुटणार हे निश्चित आहे, कारण हाच सृष्टीचा नियम आहे. 

© ॲड. शीतल शामराव चव्हाण  (मो.9921657346)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed