: मराठा आरक्षणाच्या ) मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्यावर अनेक गंभीर आरोप होत आहे. असे असतानाच भाजप नेते आशिष देशमुख यांनी जरांगे यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. “मनोज जरांगे पाटील बीड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार असणार असल्याचा दावा आशिष देशमुख यांनी केला आहे. त्यांच्या याच दाव्यामुळे आता आता राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.
याबाबत बोलतांना आशिष देशमुख म्हणाले की, “बीड लोकसभा मतदारसंघातून जरांगे यांना शरद पवार गट निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. जरांगे यांना सुरुवातीपासूनच राजकीय महत्त्वकांक्षा होती, म्हणूनच त्यांनी मराठा आरक्षणाचा आंदोलन उभं केलं आणि एवढे महिने लांबवलं. आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत beed ची जागा मिळावी म्हणून पवार गटाचे प्रयत्न राहणार असणार आहे. ती जागा शरद पवार गटाला सुटल्यानंतर तिथे मनोज जरांगे यांना उमेदवारी दिली जाईल, असेही देशमुख म्हणाले. तसेच राजेश टोपे सातत्याने मनोज जरांगे यांना भेटून आंदोलनाची दिशा निश्चित करत होते, असा आरोपही आशिष देशमुख यांनी केला आहे.
मनोज जरांगेंनी जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी : प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील मनोज जरांगे यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. “मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे अजुनही सर्व मराठा समाज आहे. त्यांनी समाजाला काँग्रेस असो की भाजप या दोघांनाही मतदान करू नका असे आवाहन करावे. तसेच जरांगे यांनी स्वतः जालना जिल्ह्यातून अपक्ष निवडणूक लढवावी. म्हणजे त्यांचा अण्णा पाटील होणार नाही. ओबीसींचे न घेता मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण देण्याची भूमिका सरकारने घ्यावी असे आंबेडकर म्हणाले आहेत.
मराठा आंदोलनाची एसआयटीमार्फत चौकशी
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी आज सभागृहात केली होती. याचवेळी अनेक भाजप आमदार आक्रमक झाले आणि त्यांच्याकडून देखील एसआयटीची मागणी करण्यात आली. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.