• Mon. Apr 28th, 2025

भाजपमधील नाराज सूर्यकांता पाटील वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत ?

Byjantaadmin

Feb 26, 2024

नांदेड : भाजपाचे नवनेते अशोक चव्हाण यांनी शनिवारी सायंकाळी आयोजित केलेल्या अनौपचारिक बैठकीला या पक्षात आधीपासूनच असलेल्या ज्येष्ठ नेत्या सूर्यकांता पाटील हजर होत्या; पण मागील पंधरवड्यात त्यांची अस्वस्थता कृती आणि काही वक्तव्यांतून समोर आली असून १० वर्षांतील उपेक्षेनंतर त्या भाजपासंदर्भात धाडसी निर्णय घेऊ शकतात, असे सांगितले जात आहे.मागील ४५ वर्षांत विधानसभा, राज्यसभा आणि लोकसभा या तीन सभागृहांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून प्रतिनिधित्व केलेल्या सूर्यकांताबाईंनी २०१४ साली भाजपात प्रवेश केला तेव्हा या पक्षातर्फे त्यांना उचित संधी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण दशकभरात त्यांना NANDED जिल्हा नियोजन समितीत अशासकीय सदस्यपदाशिवाय काहीही मिळाले नाही. विधान परिषद किंवा राज्यसभेसाठी संधी तर दूरच; त्यांच्या नावाचा साधा विचारही या काळात झाला नाही.

नांदेडमध्ये अन्य पक्षांतून भाजपात गेलेल्या नेत्यांपैकी प्रताप पाटील चिखलीकर वगळता इतर सर्वांच्या वाट्याला पक्षाकडून हेटाळणी किंवा उपेक्षाच आली. या पार्श्वभूमीवर दोन आठवड्यांपूर्वी या पक्षाने नांदेडमधून ASHOK CHAVHAN यांच्यासोबत राजकीयदृष्ट्या नवख्या डॉ.अजित गोपछडे यांना राज्यसभेवर संधी दिल्यानंतर भाजपाप्रेमींसह पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आनंदाला भरते आले, पण दुसरीकडे सूर्यकांताबाईंनी समाजमाध्यमांवर आपली खदखद व्यक्त केली.

भाजपा नेत्यांनी आपल्याला पक्ष प्रवेशावेळी योग्य ठिकाणी संधी देण्याचे आश्वासन दिल्याचे सूर्यकांताबाईंनी यापूर्वी अनेकदा म्हटले होते. पणAMIT SHAH देवेन्द्र फडणवीस, आ.बावनकुळे यांनी त्यांचे गेल्या १० वर्षांत पुनर्वसन केले नाही. आता त्यांनी वयाची पंचाहत्तरी पार केल्यामुळे त्या पक्षामध्ये राजकीय पदाच्या दृष्टीने बाद झाल्या आहेत. लोकसभेसाठी हिंगोलीतून पक्षाने एक संधी द्यावी, यासाठी त्यांचे प्रयत्न चालले होते; पण ते फलद्रूप होण्यासारखी स्थिती दिसत नाही.

मागील आठवड्यात खासदार चिखलीकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सूर्यकांताबाईंनी भाजपाच्या सर्वोच्च नेत्यावरच टीका केली. देशातील अशांतता ज्या नेत्याला कळत नाही तो या देशाला अंधारात घेऊन जात असतो, अशा शब्दांत त्यांनी आपली खदखद व्यक्त केली. त्यांच्या त्या भाषणाचे पडसाद पक्षामध्ये उमटले नसले, तरी पुढील काळात वेगळे पाऊल टाकण्याची त्यांची तयारी झाली असावी, असे मानले जात आहे.

अशोक चव्हाण यांना शक्य तेथे विरोध करणे या भांडवलावर जिल्ह्यात ज्यांनी आपले राजकारण टिकवले, त्यात सूर्यकांताबाई ह्या एक. पण आता अशोक चव्हाण यांनी भाजपात दाखल होताच जिल्ह्यात या पक्षामध्ये केंद्रस्थानी राहण्याचे पाऊल टाकल्यानंतर सूर्यकांताबाईंसह अनेकांना या पक्षात भवितव्य राहिलेले नाही. शनिवारी त्यांनी चव्हाणांच्या बैठकीला उपस्थिती लावली. स्वागताचा स्वीकार केला, पण त्यांची अस्वस्थता लपून राहिलेली नाही, असे सांगितले जात आहे.

काय म्हणाल्या, सूर्यकांता पाटील …

‘पैसा फेको और राज्यसभा देखो. महर्षी लोकांची निवड झालीयं, आता पार्टीत अधिक बळ येईल. हार्दिक अभिनंदन नेतागण ’असं सूर्यकांता पाटील यांनी कलेले सार्वजनिक ठिकाणी केलेले भाषण सध्या चर्चेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed