काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का; मराठवाड्यातील बड्या नेत्याचा राजीनामा
माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यापाठोपाठ बसवराज पाटील यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यानंतर बसवराज पाटील यांनी देखील काँग्रेसला रामराम केल्यामुळे मराठवाड्यात काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. एका महिन्यातच काँग्रेसला हा दुसरा मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसांत बसवराज पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.
काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण (Ashok Chavan), मिलिंद देवरा हे काँग्रेसमधून बाहेर पडले. यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश करताच त्यांची थेट राज्यसभेवर वर्णी लागली. तर चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे नांदेडमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडलं. आता बसवराज पाटील यांनीही पक्षाला रामराम ठोकल्यामुळे धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसला धक्का बसला आहे.
भाजपात प्रवेश करणार ?
बसवराज पाटील (Basavraj Patil) यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आता ते पुढची भूमिका काय घेतात, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. मात्र, अशोक चव्हाण यांच्यानंतर बसवराज पाटील हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे बसवराज पाटील यांनी पक्षाचा राजीनामा का दिला? हे त्यांच्या प्रतिक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.
